बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील सरस्वतीनगर मधील भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेळगाव उत्तर उपनोंदणी अधिकाऱ्यांनी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सदर तक्रारीची दखल घेत मार्केट पोलिसांनी प्रणय रत्नाकर शेट्टी (रा. पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर), राहुल एम. मगदूम (रा. रामतीर्थनगर), शिवाप्पा वाय. मुचंडी (रा. सदाशिवनगर) यांच्यासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अखत्यारीतील सरस्वतीनगर येथील सर्व्हे क्र. 70 /2 मधील 4 गुंठ्याचा भूखंड इग्नेशियस फिलिप डिसोजा (रा. शांतीनगर, टिळकवाडी) यांच्या मालकीचा आहे. याची कल्पना असूनही संशयितांनी भूखंड मालक इग्नेशियस डिसोजा यांच्या नावे बनावट खरेदी दस्ताऐवज तयार केले.
तसेच त्यांच्या नावापुढे छायाचित्र चिकटवून सरकारी दाखल्यांचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे उपनोंदणी कार्यालयांमध्ये हजर करून चौघा संशयतांनी भूखंडाची नोंदणी करत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर फसवणुकीचा प्रकार गेल्या 4 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला असून शहानिशा केल्यानंतर गेल्या बुधवारी 14 जून रोजी याप्रकरणी उपनोंदणी अधिकारी रवींद्रनाथ हंचीनाळ यांनी मार्केट पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी असे फिर्यादीत म्हंटले आहे.
सदर प्रकरणी भादंवि कलम 420, 464, 465, 467, 468, 471, 419 आणि सहकलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.