Saturday, July 27, 2024

/

विहिरींचा पाणी पुरवठा सोडवू शकते शहराची पाणी टंचाई

 belgaum

रेंगाळलेला उन्हाळा आणि लांबलेला मान्सून यामुळे सध्या बेळगाव शहरवासीयांना तीव्र उष्मा आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा जून महिन्यात पाऊस जवळपास झालाच नसल्यामुळे राकसकोप आणि हिडकल जलाशयांमध्ये आता या महिन्याअखेरपर्यंत किंवा जास्तीत जास्त जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतके पाणी शिल्लक आहे.

राकसकोप जलाशय योजना अस्तित्वात येण्यापूर्वी बेळगाव शहर पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून असायचे. यापैकी बहुतांश विहिरी या जवळपास 100 ते 200 वर्षापूर्वी ब्रिटिश काळात बांधण्यात आल्या होत्या. राकसकोप जलाशय योजनेचे शिल्पकार डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या अहवालात नमूद करून ठेवले आहे की, विहिरींच्या साखळीद्वारे बेळगावचा पाणीपुरवठा अबाधित राखला जाऊ शकतो. मात्र 1995 मध्ये राकसकोप जलाशय हे बेळगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्त्रोत बनले. तोपर्यंत 40 वर्षे जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत असल्यामुळे विहिरी निरुपयोगी झाल्या होत्या. मात्र जेंव्हा 22 जुलैपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे जलाशय कोरडे पडले आणि पाण्याच्या पर्यायी स्त्रोताचा शोध घेणे अनिवार्य झाले. त्यामुळे पुन्हा विहिरींची मदत घ्यावी लागली होती.

जनतेच्या सोयीसाठी बेळगाव शहरात 1964 साली जलशुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनीद्वारे घरोघरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची योजना अस्तित्वात आली. मात्र विहिरीच्या पाण्याची सवय झाली असल्यामुळे आणि जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्याबाबत शुद्धतेबाबत विश्वासार्हता नसल्यामुळे नागरिकांनी प्रारंभीच्या काळात नळाचे पाणी नाकारले होते. बरीच समजूत काढून देखील त्याकाळी नागरिकांचा जलवाहिनीद्वारे येणाऱ्या पाण्याला विरोध कायम असल्याचे पाहून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एक शक्कल लढवली.

विहिरी बंद केल्या की लोक आपोआप नव्या नळ पाणी योजनेचा वापरू लागतील या अपेक्षेने त्यांनी शहरातील विहिरी बंद करण्याचा आदेश काढला. मात्र उपरोधाने 50 वर्षानंतर सरकारला त्याच विहिरी पुन्हा खुल्या करण्यासाठी कष्ट घ्यावे लागले. तथापि अलीकडच्या काळातील खुल्या विहिरींचा प्रकल्प शहरवासीयांसाठी आशेचा किरण ठरला आहे. स्थानिक समस्या सोडवून सार्वजनिक सेवा सुधारणारा हा स्थानिक पुढाकार नवनिर्मितीची शक्ती दर्शविणारा ठरला. या प्रकल्पाच्या स्वरूपात बेळगाव शहराला पाण्याच्या दीर्घकालीन समस्येवर शाश्वत मार्ग मिळाला आहे. खुल्या विहिरी प्रकल्पाच्या माध्यमातून विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याद्वारे त्या सर्वांसाठी सुरक्षित आणि सुगम होतील यासाठी समाज एकत्र आला. या पुढाकारामुळे फक्त पाण्याच्या उपलब्धतेत सुधारणा झाली नाही तर समाजात जाण निर्माण होऊन शहराचा अभिमान वाढला.

Well
Khanjar galli well

शहरातील कांही प्रमुख विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आल्यानंतर बहुतांश विहिरींमध्ये पाणी पिण्यायोग्य शुद्ध बनवण्याचा प्रश्न होता. हा प्रश्न महापालिकेचे तत्कालीन मुख्य अभियंता आर. एस. नायक यांनी निकालात काढला. मास्टरमाईंड नायक यांनी शहरातील काही निवडक विहिरींवर यशस्वीरित्या लघु जलशुद्धीकरण प्रकल्प (मिनी वॉटर फिल्टर प्लांट) राबविले. या कामी त्यांना शहरातील सामाजिक संघटना, एनजीओस, खाजगी उद्योजक आणि देणगीदारांचे मोठे सहकार्य लाभले. या अतुलनीय कार्याबद्दल अभियंता आर. एस. नायक यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. विहिरीवरील या मिनी वॉटर फिल्टर प्लांट प्रकल्पाची प्रभावीता आणि क्षमता लक्षात घेऊन इतर अनेक शहरांमध्ये सदर योजना अंमलात आणली गेली हे विशेष होय.

वीरभद्रनगर येथील विहीर ब्रिटिश काळात 1908 मध्ये बांधण्यात आली जी 100 फूट खोलीची आहे. या विहिरीतील पाण्याचा झरा सुमारे 5 कि.मी. अंतरावरून दोन कातळांच्या चरीमधून येतो. या ठिकाणी तीन विहिरी बांधण्यात आल्या असून ज्या 6 फूट उंचीच्या भुयाराद्वारे एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. ब्रिटिशांनी बेळगाव शहरात अनेक विहिरी बांधल्या त्यापैकी शेट्टी गल्ली येथील विहीर फार पूर्वी 1800 साली बांधली गेली. ब्रिटिशांनी बांधलेल्या विहिरींपैकी एक विहीर शहराच्या मध्यवर्ती या ठिकाणी असून जी आयताकृती आहे आणि जी खालच्या व वरच्या बाजूला समान परिमाणात आहे.

Well hutatma chouk 12 घडगढा
Well hutatma chouk 12 घडगढा

आणखी एक विहीर मठ गल्लीत फायर ब्रिगेड स्टेशनच्या जवळ असून जी 1883 मध्ये बांधण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किर्लोस्कर रोड येथील विहीर उच्च उत्पन्न देणारी विहीर आहे. महापालिकेकडून या विहिरीचा वापर पाणीपुरवठ्यासाठी केला जातो. ज्याकरिता विहिरीच्या ठिकाणी टाकी ही उभारण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ब्रिटिशांनी गुड शेड रोड येथे एक विहीर खोदली जी 90 फूट खोल आहे. विशेष म्हणजे या सर्व विहिरी लाल मातीने (लॅटराइट) सुरक्षितरित्या वेढलेल्या आहेत.

1924 मध्ये महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले. या अधिवेशनासाठी तेव्हा पंपा सरोवर बांधण्यात आले ज्याचे नंतर काँग्रेस विहीर असे नामकरण केले गेले. ही विहीर बांधण्यासाठी त्याकाळी 4370 रुपये आणि 3 आणे इतका खर्च आला होता.

या विहिरीच्या माध्यमातून अधिवेशनाला आलेल्या हजारो लोकांना पाणी पुरवले गेले. अलीकडे काही वर्षात अनेक विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याद्वारे विविध ठिकाणच्या पाणी पुरवठ्याचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. विशेष उल्लेख करण्याजोग्या अन्य विहीरी म्हणजे शेरी गल्ली कॉर्नर हुतात्मा चौक येथील 12 गडगड्याची विहीर आणि गणपत गल्लीतील शाळा क्र. 2 येथे असलेली विहीर होय. शहरातील प्यास फाउंडेशन आणि शून्य फाउंडेशन सारख्या बिगर सरकारी संघटनानी (एनजीओ) देखील जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे हे देखील स्वागतार्ह व प्रशंसनीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.