कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण करण्याबरोबरच दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवर दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आज मंगळवारी होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी येत्या 26 जून 2023 रोजी होणार आहे.
बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे आयोजित कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने 2017 आणि 2018 मध्ये महामेळाव्याचे आयोजन केले होते.
या महामेळाव्यात सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण केले. तसेच दोन भाषिकात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, निंगोजी हुद्दार आणि समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्यावर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सरकारकडून न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून बेळगाव जेएमएफसी चौथ्या न्यायालयात या खटल्याची आज मंगळवारी सुनावणी होणार होती.
या सुनावणीत दोषारोप पत्र निश्चित होणार होते. मात्र न्यायालयाने आजची सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणीची तारीख 26 जून 2023 निश्चित केली आहे. समिती नेत्यांच्यावतीने ॲड. महेश बिर्जे आणि ॲड. एम. बी. बोंद्रे काम पाहत आहेत.