रयत गल्ली वडगाव येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे या ठिकाणची बंद अवस्थेतील कुपनलिका तात्काळ दुरुस्त करून पूर्ववत कार्यान्वित करण्याद्वारे नागरिकांच्या पाण्याची सोय करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
अवकाळी पावसाने दडी मारल्याने शहर परिसरात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष सुरु आहे. त्यात जिथे शेतकरी असतात तिथेतर ते जास्तच आहे. तशीच परिस्थिती सध्या रयत गल्ली वडगाव येथे झाली आहे. या ठिकाणी नळाचे पाणी आठ दिवसातून एकदा येते.
गल्लीतील विहिरीला पंप बसवून परिसरात पाणी पुरवल जात होते मात्र आता विहिरीच्या पाण्याची पातळीही खाली गेल्याने पंप बंद पडत असल्याने गुरांनातर सोडाच पण घरगुती वापरायलाही पाणी पुरेनासे झाल आहे.
अनेकवर्षापूर्वी रयत गल्ली येथे एक कुपनलिका खोदली होती आणि तिला पाणीही भरपूर आहे. याकूपनलिकेवर टाकी न बसवता हाताने पाणी उपसा करण्यासाठी हॅन्ड पंप बसविण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून ही सोय करण्यात आली आहे. मात्र गेल्या 6 महिन्यापासून ही कुपनलिका नादुरुस्त होऊन बंद पडली आहे. ती सुरु करण्यासाठी गल्लीतील नागरिकांनी संबधीत खात्याकडे अनेकवेळा तक्रार करूनही आश्वासन देण्याखेरीज अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
प्रभागाच्या नगरसेवकाना कल्पना दिल्यानंतर त्यांनीही तक्रार दाखल केली. परंतु त्याची देखील दखल घेण्यात आलेली नाही. तेंव्हा आता पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष होत असल्याने सदर बंद पडलेली कुपनलीका ताबडतोब दुरुस्त करुन पुर्ववत सुरु करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अन्यथा गल्लीतील शेतकरी, महिलासह इतर नागरिक संबधीत खात्यावर धडक दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.