बेळगाव दक्षिण मतदार संघातील सुभाषचंद्रनगर येथील रहिवाशी आणि उद्योजकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना आपला संपूर्ण पाठिंबा देण्याबरोबरच त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज रविवारी सकाळी सुभाषचंद्रनगर भागाला भेट दिली. यावेळी तेथील माजी नगरसेविका अरुणा कुट्रे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या नागरिकांच्या बैठकीमध्ये उपरोक्त निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रारंभी सर्व नागरिकांनी रमाकांत कोंडुसकर यांचे स्वागत आणि उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी शहरातील विशेष करून सुभाषचंद्रनगर, उद्यमबाग वगैरे बेळगाव दक्षिण भागातील विविध समस्यांची माहिती उमेदवार कोंडुसकर देण्यात आली.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांचे शिक्षण, झाडांची मोठ्या प्रमाणात होत असलेली कत्तल, वाढते काँक्रिटीकरण आदी समस्या यावेळी मांडण्यात आल्या सध्या खानापूर रोडचे जे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे त्याची खरे तर आवश्यकता नव्हती. अलीकडेच तो रस्ता नव्याने बनविण्यात आला होता. मात्र आता काँक्रीटचे मोठे ब्लॉक घालून हा रस्ता नव्याने बनवण्यात येत आहे. त्यामुळे उंच झालेला रस्ता ओलांडणे गैसोयीचे होत आहे, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.
सदर चर्चेत उद्योजक आप्पासाहेब गुरव, नितीन धोंड, अनिल कुट्रे, माजी नगरसेवक सुरेश रेडेकर, माजी नगरसेविका अरुणा कुट्रे, अरुण कुट्रे आदींनी भाग घेतला होता. उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी मोठे आपुलकीने सर्व समस्या जाणून घेतल्या. येत्या निवडणुकीत स्वतःसाठी सर्वांकडून मोठ्या प्रमाणात मतदानाची अपेक्षा व्यक्त करताना पुढील काळात सुभाषचंद्रनगर वासियांच्या सेवेसाठी आपण कायम तत्पर राहू असे आश्वासन कोंडुसकर यांनी दिले.
बैठकीस प्रकाश गोखले, राजाभाऊ चौगुले, सिद्धार्थ हुंदरे, अविनाश खन्नूकर, माजी ता. पं. सदस्य मारुती लोहार, शिरीष करडे, अनंत सावंत, नित्यानंद करमळी, राजाभाऊ चौगुले, सीमा लोहार, प्रमोद कदम, कुशल कुट्रे, मिलिंद चौगुले आदींसह सुभाषचंद्रनगरवासीय बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी कोंडुसकर यांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.