महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी चेकपोस्टनजीक पोलिस आणि निवडणूक विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत खाजगी प्रवासी बस मधील एका प्रवाशांकडून 1.5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी चेकपोस्टनजीक एका खाजगी प्रवासी बसची निवडणूक विभागाच्या विशेष पथकासह पोलिसांनी कसून झडती घेतली याप्रसंगी एका बॅगेमध्ये 1.5 रुपयांच्या नोटांच्या थप्प्या आढळून आल्या.
या संदर्भात ती बॅग घेऊन जाणाऱ्या प्रवाशाकडे चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळून शकली नाहीत. त्याचप्रमाणे त्या रोख रकमेसंदर्भातील कागदपत्रे देखील त्याच्याकडे नसल्यामुळे ती रक्कम जप्त करण्यात आली.
गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात अशा पद्धतीने अनेक ठिकाणी स्पष्टीकरण नसलेली अव्यक्त रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विविध चेकपोस्टच्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या या रकमेचा आकडा एकूण 3.61 कोटी रुपये इतका आहे.
दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्र व अन्य राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व वाहनांची या ठिकाणी कसून तपासणी सुरू असून काल दिवसभरात सुमारे 2000 वाहने तपासणी करून सोडण्यात आली.
या ठिकाणी पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे संयुक्त पथक तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहे. एका पाळीत 400 ते 500 वाहनधारकांची तपासणी केली जात आहे.