बेळगाव लाईव्ह : राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजप पिछाडीवर असून येत्या शनिवारी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, या या यादीत अनेक जागांवर नवे चेहरे दिसतील, शिवाय निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड लोकशाही पद्धतीने होत आहे , अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
भाजपच्या राज्य निवड समितीच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारांची यादी मंजूर केली की शनिवार दि. ८ एप्रिल रोजी उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. ही प्रक्रिया लोकशाही पद्धतीने आणि सुरळीतपणे पार पडेल. भाजप निवडणूक रिंगणात नवे चेहरे उतरविणार असल्याच्या वृत्ताला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला. यासंदर्भात बोलताना त्यांनी, काही मतदारसंघात नवे प्रयोग करण्याचे नियोजन असून हे चित्र प्रत्यक्षात येईल. काही जागांवर आश्चर्यकारक निकाल लागतील, हे तुम्हाला काही दिवसांत पाहायला मिळेल. आमचे नेत्यांना व कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे. कर्नाटकमध्ये भाजप पुन्हा बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला.
काही नेते निवडणुकीपूर्वी पक्ष सोडत आहेत, याचा पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या भाजपचे १२५ आमदार असून यापैकी दोन ते ३ जण पक्ष सोडू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
उमेदवार निवडीसाठी जिल्हा समित्यांची दोन दिवसांची बैठक पूर्ण झाली आहे. केंद्रीय नेत्यांकडे संभाव्य उमेदवारांची यादी पाठवून आज आणि उद्या आणखी एकदा आढावा घेण्यात येईल. भाजप नेतृत्वाकडून उमेदवारी यादीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर ८ एप्रिलला नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती बोम्मई यांनी दिली.