बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली सीमाभागातील मराठी भाषिक एकवटत आहे. सीमाभागात ग्रामीण, दक्षिण, उत्तर आणि खानापूर या चार मतदार संघांसह निपाणी आणि यमकनमर्डी मतदार संघात देखील यंदाची निवडणूक महाराष्ट्र एकीकरण समिती लढवत आहे. समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी मराठी मतदारांची गर्दी मोठ्या संख्येने जमत आहे. परंतु या गर्दीचे रूपांतर निवडणुकीच्या काळात मतदानात परिवर्तित होणे आवश्यक आहे.
समितीचा हा लढा सत्तेसाठी किंवा पदासाठी नसून मराठी भाषिकांच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आहे. कर्नाटकाकडून मिळणाऱ्या दुटप्पी वागणुकीला प्रत्त्युत्तर देण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी आहे. सीमाभागात होणारी माय मराठीची गळचेपी, मराठी भाषिकांवर सातत्याने होणारे अन्याय, अत्याचार या सर्व गोष्टींना आपल्या मतांच्या माध्यमातून चोख प्रत्त्युत्तर देण्याची गरज आता येऊन ठेपली आहे.
सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे बंड आता शमले आहे. समितीपासून दुरावलेला मराठी भाषिक पुन्हा समितीच्या प्रवाहात येत आहे. प्रत्येक मतदार संघात समितीने एकमेव उमेदवार देऊन मराठी भाषिकांना एकसंघ आणण्यात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र आता खरी कसोटी हि मराठी भाषिकांची आहे. प्रचार फेरी, पदयात्रा, प्रचार सभा यादरम्यान दिसणाऱ्या गर्दीने मीच उमेदवार आणि मीच आमदार अशापद्धतीने जीवाचे रान करून काम करणे गरजेचे आहे. गेल्या ६६ वर्षांपासून अन्याय-अत्याचाराच्या झळा सोसणाऱ्या मराठी भाषिकांनी ‘आता नाही तर कधीच नाही’ हि बाब ओळखून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. केवळ आपले एकट्याचे नव्हे तर आपल्यासोबत आणखी मराठी भाषिक मतदार कसे जोडले जातील, यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे.
मराठी समाजाला दुहीचा शाप असल्याचे नेहमीच बोलले जाते. मात्र मराठा एकदा का पेटून उठला कि तो आपल्यासमोर येणाऱ्या कोणत्याही वादळाला न जुमानता आपले अस्तित्व राखतो आणि अस्तित्व सिद्धही करतो हे आजतागायत सिद्ध झाले आहे.
यामुळे सीमाभागात आपले अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी आणि आपली अस्मिता जपण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या जीवाचे रान करून निवडणूक काळात कार्य करणेही गरजेचे आहे.