राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी सहकार्य केले,त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक 21 रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज ) येथे आयोजित करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 19 रोजी राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक समारंभासाठी समाजातील ज्या दानशूर व्यक्तींनी आर्थिक व वस्तुरूपाने मदत केली तसेच समस्त शिवभक्तांनी राजाहंसगडावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शुक्रवार दिनांक 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनानिमित्त बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी देशातील शेतकरी नेते,व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत.हा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी या बैठकीत कार्यकर्त्यांनी विचार व्यक्त करावेत.
यासाठी या बैठकीला बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस वकील एम जी पाटील व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.