बेळगावच्या नियोजित रिंगरोडच्या पहिल्या पॅकेजच्या कामासाठी कंत्राटदार निश्चित झाला असून जीआर इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला या कामाचे कंत्राट मिळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेळगावच्या नियोजित रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील 34 कि.मी. लांबीच्या रस्ते कामाचे कंत्राट देण्यासाठी प्राधिकरणाने 1हजार 83 कोटी 45 लाख रुपयांची निविदा काढली होती. ही निविदा प्रक्रिया 28 मार्च रोजी पूर्ण झाल्यानंतर नामांकित सहा कंपन्यांनी निविदा दाखल केली होती.
यामध्ये आयआरबी, केएनआर, एमसीएल, ओसीई, जीआर इन्फ्रा आणि रवी इन्फ्रा या कंपन्यांचा समावेश होता. त्यामध्ये सर्वात कमी रकमेची म्हणजे 897 कोटी 37 लाख रुपये रकमेची निविदा जीआर इन्फ्रा लिमिटेड या कंपनीचे असल्यामुळे त्या कंपनीला रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील पॅकेजेच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे.
बेळगाव शहराच्या नियोजित रिंग रोडसाठी बेळगाव तालुक्यातील 32 गावांमधील जमीन संपादित केली जाणार असल्यामुळे सदर प्रकल्पाला संबंधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन छेडून हा विरोध प्रकट केला जात आहे.
याखेरीज भूसंपादनाच्या विरोधात लेखी आक्षेप ही नोंदविण्यात येत आहेत. एवढा विरोध असूनही आता जीआर इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला रिंग रोडच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या आधी हलगा -मच्छे बायपासचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू केले होते.
मात्र त्याला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. याखेरीज बायपासच्या विरोधात याचिकाही दाखल केली. न्यायालयाने बायपासला स्थगिती दिल्यामुळे सध्या या रस्त्याचे काम बंद आहे. आता रिंग रोडच्या विरोधात शेतकरी यापुढे कोणती भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.