belgaum

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी सर्व इच्छुक उमेदवारांना विश्वासात घेऊन पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान भारतीय जनता पक्षासमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी काँग्रेसने यापूर्वीच आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली असली तरी भाजपला इच्छुक असलेल्या पाच उमेदवारांमधून एकाची निवड करण्याचा निर्णय अद्यापही घेता आलेला नाही.

खानापूर विधानसभा मतदारसंघात नेहमीच अटीतटीची लढत होऊन प्रमुख राजकीय पक्षाचा उमेदवार विजयी होत असल्यामुळे खानापूर तालुका नेहमीच संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत असतो. एकेकाळी खानापूर विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते. मात्र समितीच्या या बालेकिल्ल्याला 2008 मधील विधानसभा निवडणुकीत पहिला हादरा बसला. जेंव्हा त्यांचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला.

तत्पूर्वी 1972 पासून 2008 पर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला या मतदारसंघात कोणीही हरवू शकले नव्हते. तथापि भाजप उमेदवार प्रल्हाद रेहमानी यांनी 2008 मध्ये समितीच्या अभेद्य किल्ल्याला खिंडार पाडताना नजीकचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे रफिक खानापुरी यांना पराभूत करून विजय संपादन केला.

तथापि 2013 च्या निवडणुकीमध्ये रेमानी आपली आमदारकी अबाधीत राखू शकले नाहीत आणि त्यावेळी पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार विजयी झाला. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने स्वतंत्र उमेदवार अरविंद पाटील यांना पाठिंबा दिला, ज्यांनी काँग्रेस उमेदवार रफिक खानापुरी यांना पराभूत केले. धडाडीचे आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी डॉ. अंजली निंबाळकर ज्यांनी 2013 ची निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढविली होती, त्यांना 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळवण्यात यश आले. त्यांनी त्यावेळी भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना 5133 मतांच्या फरकाने पराभूत केले होते.

आता यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना पुन्हा काँग्रेसची उमेदवारी मिळाली असून त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. डॉ. निंबाळकर यांनी आत्तापर्यंत दोन वेळा तालुक्यातील 300 खेडेगावांमधील घराघरापर्यंत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. या गाठीभेटीप्रसंगी प्रत्येक वेळी आपण आजवर केलेल्या विकास कामांची आणि भविष्यात हाती घेऊ इच्छिणाऱ्या विकास कामांची माहिती त्या मतदारांना देत आहेत. खानापूर मतदार संघासाठी निधर्मी जनता दलाने पुन्हा नासिर बागवान यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. बागवान यांनी यापूर्वीच्या दोन निवडणुका लढविल्या असून त्यांना 18 टक्क्यापेक्षा अधिक मते मिळालेली नाहीत.

माजी आमदार अरविंद पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला रामराम ठोकल्यानंतर अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुरलीधर पाटील आबासाहेब दळवी आणि निरंजन देसाई हे दोघे महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा मिळवून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे सेवानिवृत्त शिक्षक असलेले आणि साखर कारखान्यासह सहकारी सोसायटींची साखळी चालवणारे विठ्ठल हलगेकर सध्या भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत बंडखोर भाजप उमेदवार ज्योतिबा रेमाणी यांनी 5898 मतं फोडल्यामुळे हलगेकर यांना 5133 मतांनी पराभूत व्हावे लागले होते. यावेळी त्यांनी निवडणूक तिकिटाच्या अपेक्षेने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

तथापि खानापुरातील भाजपनेत्या धनश्री सरदेसाई आणि डॉ. सोनाली सरनोबत या भाजपच्या उमेदवारीसाठी दावेदार आहेत दोन्ही महिला पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच स्व-क्षमतेवर, खानापुरातील गरीब गरजू लोकांच्या समस्या दूर करतात हे विशेष होय. महाराष्ट्र एकीकरण समितीतून बाहेर पडून काही महिन्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी आमदार अरविंद पाटील यांना वरिष्ठ भाजप नेते लक्ष्मण सवदी यांचा पाठिंबा आहे, शिवाय त्यांची खानापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर चांगली पकड असल्यामुळे आपल्याला भाजपचे तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.

खानापुरातील भाजपचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद कोचेरी हे देखील भाजप उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. खानापूर विधानसभा मतदार संघावर मराठी भाषिक मराठा मतदारांचे वर्चस्व आहे. या ठिकाणी 70 टक्के मराठा मतदार असून त्यापाठोपाठ मुस्लिम, लिंगायत आणि इतर जातींचा क्रम लागतो. गेल्या अनेक वर्षापासून येथील मराठा मतदार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आला असल्यामुळे या ठिकाणी विजय संपादन करणे राष्ट्रीय पक्षांसाठी नेहमीच अवघड जात असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.