बेळगाव लाईव्ह : राज्यात येत्या २७ मार्चपासून इयत्ता पाचवी व आठवी वर्गाच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने परीक्षेची तयारी सुरु असतानाच राज्यातील ४ हजार खासगी शाळा परीक्षेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत.
मात्र, न्यायालायने परीक्षा रद्द करण्यास नकार दिला असून, पुढील सुनावणी २७ मार्च रोजी निर्धारित केली आहे. दरम्यान बोर्ड परीक्षाही त्याचदिवशी सुरु होत असल्याने या परीक्षेबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कलिका अभ्यासक्रमावर अवलंबून आहेत. त्यामुळे खासगी शाळा सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत. सरकारी शाळांमध्ये कलिका अभ्यासक्रमाअंतर्गत पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मार्गदर्शनावर आधारीत अभ्यासक्रमावर बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत.
मात्र हा उपक्रम खासगी शाळेत राबवला गेला नाही. त्यामुळे खासगी शाळांवर अन्याय होत असल्याची माहिती खासगी शाळांनी दिली. पाचवी आणि आठवीच्या बोर्ड परीक्षेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. यावर २७ मार्च रोजी सुनावणी करण्याचे सरन्यायाधीशांनी मान्य केले. परंतु, त्याच दिवशी पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षा सुरु होणार असल्याने त्या होणार की नाहीत याकडे पालक, विद्यार्थी व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
सदर याचिकेवर २७ मार्चच्या आधी सुनावणी घेण्याची विनंती संघटनेच्या वकिलांनी केली; पण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी वकिलांची विनंती फेटाळत आदेशात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला. राज्यासाठी काय चांगले आहे, हे उच्च न्यायालयाला माहीत आहे, असे ते म्हणाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक शिक्षण खात्याने पाचवी व आठवीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कमी झाल्याने शिक्षण खात्याने अध्ययन पुनर्प्राप्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे काही शाळांनी अध्ययन पुनर्प्राप्तीनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम घेतला आहे. तर काही शाळांनी राज्य पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविला आहे. त्यामुळे कोणत्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार असा प्रश्न पालक व शिक्षकांमधून विचारला जात आहे. परीक्षेसाठी मूल्यांकन मंडळातर्फे प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे.