निवडणुकीचे वारे वाहत असलेल्या कर्नाटक राज्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगाव दौरा म्हणजे कर्नाटकातील बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारसाठी एक प्रकारे लॉटरी लागली आहे.
पंतप्रधान मोदी गेल्या 27 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आले होते. राज्य सरकारने त्यांच्या फक्त बेळगावातील कार्यक्रमाचा खर्च तब्बल 14 कोटी रुपये दाखवला असल्याची माहिती साउथ फर्स्ट डॉट कॉम या वेबसाईटने प्रसिद्ध केली आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकाचा दौरा करताना बेळगाव आणि शिमोगा येथील कार्यक्रमात सहभाग दर्शविला. बेळगाव येथील कार्यक्रमांमध्ये तर ते जेमतेम चार-पाच तासासाठी उपस्थित होते. मात्र या एकंदर कार्यक्रमाचा खर्च तब्बल 14 कोटी रुपये इतका दाखविण्यात आला आहे.
कर्नाटकच्या आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी नव्याने विकसित केलेल्या शिमोगा येथील विमानतळाचे आणि नूतनीकृत बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याबरोबरच प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत तेराव्या टप्प्यातील 16000 कोटी रुपयांचा निधी देशभरातील शेतकऱ्यांसाठी वितरित केला. त्याचप्रमाणे केंद्रीय जलजीवन मिशन या योजनेचे भूमिपूजनही केले.
या पद्धतीने जवळपास 5 तासांच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी राज्य सरकारने बेळगाव जिल्हा प्रशासन आणि संबंधित अन्य प्रशासनाने सादर केलेल्या सुमारे 15.3 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे बेळगाव शहरातील 10.7 कि. मी. अंतराच्या पंतप्रधानांच्या रोडशोसाठी रस्त्याच्या दुतर्फा आणि रहदारी नियंत्रणासाठी जे बॅरिकेड्स घालण्यात आले होते, त्याचा खर्च चक्क 2 कोटी रुपये दाखविण्यात आला असल्याची माहिती साउथ फर्स्ट डॉट कॉम या वेबसाईटने प्रसिद्ध केली आहे.