कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज गुरुवार 9 मार्चपासून तीन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आले असल्यामुळे येत्या 15 दिवसात निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
कर्नाटकातील विधानसभा निवडणूक होऊ घातली असून त्या अनुषंगाने राज्यातील सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आज गुरुवार 9 मार्चपासून तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे येत्या 22 मार्चनंतर केंव्हाही राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकी वेळी म्हणजे 2018 मध्ये 30 मार्च रोजी निवडणूक आचारसंहिता लागू झाली होती. मात्र यावेळी ही आचारसंहिता साधारण आठवडाभर आधीच लागू होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने देखील जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने काल बुधवारी जिल्हाधिकारी तथा मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या समवेत जिल्ह्यातील कांही मतदान केंद्रांच्या ठिकाणी भेटी देऊन तेथील मूलभूत सुविधांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या आहेत.
आपल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रत्येक केंद्रातील प्रकाश योजना, पंखे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधांचा आढावा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार प्रत्येक केंद्रात किमान आवश्यक मूलभूत सुविधा आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.
दिव्यांग मतदारांसाठी तीन चाकी सायकल यांची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
कर्नाटक राज्यात 224 विधानसभा मतदासंघात दोन टप्प्यात मतदान होऊ शकते बेळगावात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.