बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या १० मे रोजी राज्यात एका टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. संपूर्ण कर्नाटकात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागातील मतदार संघात आगामी निवडणुकीत निर्णायक मुद्द्यावर निवडणूक लढविली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. बुधवार दि. २९ मार्चपासून निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली असून बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर आणि खानापूर मतदार संघ या चार मतदार संघात विविध मुद्द्यांवर निवडणूक गाजली जाण्याची शक्यता आहे.
सीमाभागात गेल्या वर्ष-दीड वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा अधिक गाजला आहे. विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान, त्यानंतर अचानक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना आलेला शिवाजी महाराजांचा आणि मराठी भाषिकांचा पुळका! आणि यावरून सुरु झालेले राजकीय घमासान!
आगामी निवडणुकीत सीमाभागात सर्वाधिक पुढे असणारा हा महत्वाचा मुद्दा आहे. नुकतेच राजहंसगडावरील शिवाजी महाराज मूर्ती प्रकरण आणि रेल्वे स्थानकावरील शिवाजी महाराजांचे शिल्प यावरून मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रीय पक्षांनी दोनवेळा राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे केलेले अनावरण, महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यानंतर आयोजिलेला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक सोहळा, काँग्रेसच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून आलेले छत्रपती संभाजी राजे आणि खासदार धीरज देशमुख, रेल्वे स्थानकाच्या उदघाटनाच्या एक दिवस आधी रेल्वेस्थानकाच्या आत लपविण्यात आलेले शिल्प, पंतप्रधान मोदींच्या बेळगाव दौऱ्यात जाणीवपूर्वक मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाला देण्यात आलेली बगल, आणि अगदी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सुवर्णविधानसौध समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि याचदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला विसर, गेल्या एक-दीड वर्षात ज्या ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला त्यावेळी चकार शब्द न काढणाऱ्या राष्ट्रीय पक्ष आणि राजकीय नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर अचानक राजहंसगड, शिवचरित्र या माध्यमातून शिवाजी महाराजांची आठवण का झाली? इतके दिवस शिवमूर्ती अवमानप्रकारणी मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायावेळी राजकारण्यांनी ब्र देखील काढला नाही मात्र आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करावे! या गोष्टी राजकीय स्वार्थ दर्शविणाऱ्याच ठरल्या. या सर्व गोष्टी पाहता आगामी निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा अधिक गाजण्याची शक्यता आहे.
त्यापाठोपाठ सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांची संख्या पाहता भाषिक अल्पसंख्यांक हक्क हा मुद्दा देखील या निवडणुकीत गाजू शकतो. सीमाभागात असणाऱ्या मराठी भाषिकांच्या संख्येचा विचार करता भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठीतून कागदपत्रे मिळावीत अशी मागणी केली जात आहे. मात्र येथील सरकारने भाषिक हक्क डावलून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. बेळगावमध्ये हा मुद्दादेखील निवडणुकीदरम्यान पुढे येण्याची शक्यता आहे.
याचप्रमाणे बेळगावमधील स्मार्ट सिटी योजना हि सुरुवातीपासूनच तक्रारींच्या कचाट्यात सापडली आहे. नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या या योजनेमुळे शहराचा विकास होण्या ऐवजी शहर भकास झाल्याचा आरोप होत आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही बेळगावमधील जनता विकासापासून वंचित आहे. रस्ते, गटारी, पथदीप, पाणीप्रश्न, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, कचऱ्याची समस्या यासह अनेक असुविधांचा सामना नागरिक करत आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांनी दाखविलेली विकासाची स्वप्ने आणि सवर्सामान्यांचा झालेला भ्रमनिरास हे पाहता या मुद्द्यावरून देखील निवडणूक गाजण्याची शक्यता आहे.
यासह बेळगाव महानगरपालिकेचे उशिरा अस्तित्वात आलेले सभागृह, नगरसेवकांना उशिरा मिळालेली जबाबदारी, यामुळे शहरात निर्माण झालेल्या असुविधा, मूलभूत सुविधांसंदर्भातील समस्या, आरक्षण, ग्रामीण भागातील विकासकामावरून सुरु असलेले राजकारण, महागाई आणि या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्यांचे बेहाल झालेले जगणे असे अनेक महत्वपूर्ण मुद्दे या निवडणुकीत राजकारण्यांसमोर आहेत, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.