शांताई वृद्धाश्रम आणि आयएमईआरच्या संयुक्त विद्यमाने ‘शांताई’च्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुप्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मधुमेहावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. जगन्नाथ दीक्षित हे मधुमेह मुक्त भारत व्हावा या उद्देशाने मधुमेह कशा पद्धतीने बरा होईल? आणि त्याच्यातून आपण कसं बाहेर पडावे? यावर संपूर्ण देशभर व्याख्यानं देत आहेत. दोन वेळा जेवण करूनही आपण मधुमेहाला दूर ठेवून आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवू शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात डॉ. जगन्नाथ दीक्षित तज्ञ मानले जातात. बेळगावात उद्या गुरुवारी 30 तारखेला होणारे त्यांचे व्याख्यान आयएमईआर हॉल हिंदवाडी येथे ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमास आयएमईआर चेअरमन मुतालिक सर त्याचबरोबर उद्योगपती विजय पाटील, विनायक लोकुर आणि शांताईचे संचालक संतोष ममदापूर उपस्थित राहणार आहेत. तरी शहरवासीयांनी सर्वांसाठी मोफत असलेल्या या व्याख्यानाचा मोठ्या संख्येने लाभ घेऊन आपले आरोग्य छान तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे.
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी आयएमईआरचे चेअरमन आणि संचालकांनी संस्थेचा हॉल विनाशुल्क वापरण्यास दिला आहे हे विशेष होय. दरम्यान, शांताई विद्या आधारच्यावतीने ‘रद्दीतून बुद्धीकडे’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून वृत्तपत्रांसह कागदपत्रांची रद्दी जमा करून गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची जबाबदारी गेल्या 8 वर्षापासून घेतली जात आहे.
या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाला येताना नागरिकांनी जमल्यास किमान 2 किलो रद्दी स्वतः सोबत आणण्याचे कष्ट घ्यावेत, असे आवाहनही शांताई विद्या आधारचे अध्यक्ष विनायक लोकुर व माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे.