महिला व बालकल्याण खात्याला दूध पावडरचा पुरवठा न झाल्याने बेळगाव जिल्ह्यातील गर्भवती व बाळंतीण महिलांसह 5 लाखाहून अधिक मुलांना दुधापासून वंचित राहावे लागत असून यामुळे महिला व मुलांमध्ये पोषणाची कमतरता दिसून येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुपोषण रोखण्यासाठी गर्भवती बाळंतीण महिला आणि मुलांना राज्य सरकारकडून क्षीरभाग्य योजनेअंतर्गत दुधाचे वाटप केले जाते. यासाठी अंगणवाडी केंद्रांना दूध पावडरचे वितरण केले जाते. मात्र तुटवडा निर्माण झाल्याचे सांगत गेल्या 6 महिन्यापासून अंगणवाडी केंद्रांना दूध पावडरचे वितरण झालेले नाही.
महिला व बालकल्याण खात्याच्या माहितीनुसार प्रत्येक अंगणवाडीला दरमहा किमान 3 किलो दूध पावडरची गरज आहे. मात्र गेल्या ऑक्टोबर पासून 1 किलोही दूध पावडरचे वितरण झालेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून महिला व बालकल्याण खात्याने याबाबत तातडीने पावले उचलावीत अशी मागणी वाढू लागली आहे.
जिल्ह्यातील दुधाच्या लाभार्थींची संख्या एकूण 5 लाख 7 हजार 466 इतकी आहे. यामध्ये (अनुक्रमे विभाग व संख्या यानुसार) 1 ते 3 वर्षे वयाची बालके -2 लाख 8 हजार 891, 3 ते 6 वर्षे वयाची बालके -2 लाख 1 हजार 855, गर्भवती महिला -48 हजार 931, बाळंतीण महिला 47 हजार 899 यांचा समावेश आहे.
दरम्यान दूध पावडरचा पुरवठा होताच पुन्हा दूध वितरणाला सुरुवात होईल, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज ए. एम. यांनी दिली आहे.