छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ तसेच मराठी माणसांची एकजुटीची ताकद दाखवण्याबरोबरच मराठी संस्कृती अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 22 ते 26 फेब्रुवारीपर्यंत ‘शिव सन्मान पदयात्रा’ आयोजीत करण्यात आली असून बेळगाव शहरासह ग्रामीण भागात फिरणाऱ्या या पदयात्रेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शिवसन्मान पदयात्रा पहिल्या दिवशी दि. 22 फेब्रुवारी रोजी राजहंसगड येथून प्रारंभ होईल. त्यानंतर ती यरमाळ, अवचारट्टी, देवगनहट्टी, धामणे मार्गे फिरून पुन्हा येळ्ळूर येथे पदयात्रेचे ग्रामवास्तव्य असेल. यावेळी कोल्हापूरचे शिवव्याख्याते मधुकर पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
दुसऱ्या दिवशी दि. 23 फेब्रुवारी रोजी येळ्ळूर, सुळगे, देसुर, झाडशहापूर, मच्छे, हुंचानट्टी, बाळगमट्टी, कुट्टलवाडी मार्गे पिरनवाडी येथे ग्रामवास्तव्य. तिसऱ्या दिवशी दि. 24 फेब्रुवारी रोजी पिरनवाडी, ब्रह्मनगर, खादरवाडी, राजारामनगर, मजगाव, रोहिदासनगर, चन्नमानगर, पार्वतीनगर, भवानीनगर. दि. 25 फेब्रुवारी रोजी भवानीनगर, पापा मळा, शिवाजी कॉलनी, नानावाडी, टिळकवाडी, अनगोळ, भाग्यनगर, वडगाव असा पदयात्रेचा मार्ग असेल.
शेवटच्या दिवशी 26 फेब्रुवारी रोजी वडगाव, जुने बेळगाव, सोनार गल्ली, नाथ पै सर्कल, शिवाजी उद्यान महात्मा फुले रोड, गोवावेस मार्गे फिरून बेळगाव रेल्वे स्थानक येथे शिवसन्मान पदयात्रेची सांगता होणार आहे.
पदयात्रेदरम्यानच्या ग्रामवास्तव्यात पोवाडे, भजन, शिवचरित्रावरील व्याख्याने आदी माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधणार आहेत.
पहिल्या दिवशी येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी देवी मंदिरात तर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी श्री महालक्ष्मी मंगल कार्यालयात, तिसऱ्या दिवशी भवानी नगर येथील श्री गणेश मंदिरात तर चौथा दिवस वडगाव येथील श्री मंगाई मंदिर येथे वास्तव्य असणार आहे.