केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग येत्या आठवड्यात गुरुवार दि. 2 मार्च 2023 रोजी बेळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजकीय शिष्टाचाराला अनुसरून संरक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी बेळगावला येणारे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे संरक्षण मंत्र्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबरोबरच येळ्ळूर राजहंस गडावरील छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
भव्य समारंभाद्वारे येत्या 2 मार्च रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते शिव छत्रपतींच्या पुतळा उद्घाटनाची तयारी सुरू असतानाच शहरानजिकच्या राजहंसगडावरील हा पुतळा बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील वादाचा विषय ठरला आहे.
राजहंस गडावरील शिवरायांची मूर्ती स्थापन करण्यात आपले महत्त्वाचे योगदान आहे असा दावा आमदार हेब्बाळकर आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे. दुसरीकडे भाजप सरकारनेच राजहंसगडाच्या विकासासाठी आणि शिव पुतळा उभारणीसाठी भरीव निधी दिल्याचे आमदार रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजप नेत्याचे म्हणणे आहे.
यातूनच वादाची ठिणगी पडली असून उभयपक्ष राजहंस गडावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा उद्घाटनाचे श्रेय आपल्याला मिळाले पाहिजे असा दावा करत आहेत.