Wednesday, October 9, 2024

/

खानापूर मधील राजकारणाची रस्सीखेच!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्यापासूनच अनेक इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरस ग्रामीण मतदार संघात पाहायला मिळेल असे चित्र जरी असले तरी खानापूर मतदार संघातही दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासूनच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरु केलेल्या उमेदवारांनी आता निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे.

भाजपमधून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल, या आशेने म. ए. समितीला रामराम ठोकून भाजप प्रवेश केलेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मागील निवडणुकीत २६६१३ मते मिळाली. या पराभवानंतर माजी आम. अरविंद पाटील यांनी राष्ट्रीय पक्षाचा मार्ग स्वीकारला. सध्या माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि आमदार महांतेश दोड्डगौडर यांचा राजकीय वरदहस्त त्यांच्या पाठीशी आहे. लिंगायत समाजाचा पाठिंबा, डीसीसी बँकेच्या माध्यमातून प्राथमिक कृषीपत्तीन संस्था आणि संस्था संचालकांच्या माध्यमातून त्यांना मोठा फायदा होणार आहे. सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळेही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

दुसरीकडे मागील निवडणुकीत ३१५१६ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आलेले भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचाही जनसंपर्क मोठा आहे. मागीलवेळी भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र दुसऱ्या स्थानावर त्यांनी मिळविलेली मते पाहता आगामी निवडणुकीत हलगेकरांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता आहे. याव्यतिरिक्त पराभव होऊनही निकालाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आणि आजतागायत ते ज्या पद्धतीने विविध उपक्रम राबवून जनसंपर्क वाढवत आहेत, या दृष्टिकोनातून पक्ष त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता अधिक आहे.

काँग्रेसमधून विद्यमान आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी मागील निवडणुकीत ३६६४९ मताधिक्याने विजय मिळविला. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित आहे. हि जरी जमेची बाजू असली तरी, खानापूर तालुक्यातील जनतेचा त्यांच्याविषयीचा प्रतिसाद पाहता जनसंपर्क कमी असल्याबाबत त्यांच्याविषयी तक्रारी आहेत. आजतागायत त्यांनी अनेक विकासकामांवर भर दिला आहे. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची पोचपावती त्यांना या विधानसभा निवडणुकीत मिळणार आहे.

मागील निवडणुकीत २७२७२ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नासिर बागवान हेदेखील जेडीएसमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. सध्या ते पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार असून गेल्या सहा महिन्यांपासून ते मतदार संघात सक्रियपणे कार्य करताना दिसत आहेत. मंदिरांना देणग्या देणे, मतदार संघात विविध उपक्रम राबविणे अशापद्धतीने ते निवडणुकीपूर्वी नेहमीच सक्रिय असलेले पाहायला मिळतात. २ महिन्यांपूर्वीच त्यांनी आपले कार्यालय देखील सुरु केले असून सर्वसमावेशक मतांचा समावेश असलेल्या नासिर बागवान यांच्या हाती विशाल पाटील यांच्यासारखा मराठी माणूस लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विशाल पाटील यांच्या माध्यमातून मराठी मातांचीची बेरीज त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

खानापूर समितीकडे सध्या ७ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. मुरलीधर पाटील हेदेखील या ७ जणांपैकी एक आहेत. मुरलीधर पाटील हे खानापूर पीएलडी बँकेचे अध्यक्षपद भूषवित आहेत. २००४ साली त्यांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना १२ ते १३ हजार मते मिळाली होती. आजतागायत त्यांनी भाजप व्यतिरिक्त अनेक पक्षात प्रवेश केला आहे. सध्या समितीच्या माध्यमातून ते अत्यंत सक्रियपणे काम करत आहेत. त्यांचाही जनसंपर्क मोठा आहे सध्या त्यांची उमेदवारी साठी मोठी दावेदारी आहे.Khanapur election

याचबरोबर आबासाहेब दळवी हे देखील समितीमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. निवृत्तीनंतर ते पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असून एकेकाळी समितीचे सारथ्य करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन समितीला बळ देण्याचे काम केले आहे. राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या गेल्या वर्ष भरा पासून त्यांनी जोर जनसंपर्क जोर वाढवला आहे आबासाहेब दळवी हेदेखील समिती उमेदवारीसाठी दावेदार आहेत.

समितीमध्ये सध्या निरंजन सरदेसाई हे व्यक्तिमत्व देखील सकारात्मक पद्धतीने सक्रिय आहे. एक तरुण चेहरा आणि तीन वेळा आमदारकी गाजविलेले माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांचे पुतणे असणाऱ्या निरंजन सरदेसाई यांनीही उमेदवारीसाठी अर्ज दिला आहे. मात्र समितीमधील ज्येष्ठ नेते नव्या चेहऱ्याला संधी देतील का? हाही प्रश्न आहे.

मागील निवडणुकीत विलास बेळगावकर यांनी १७८५१ मते मिळविली. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार असूनही पाचव्या क्रमांकावर आलेल्या बेळगावकरांना समितीचा बालेकिल्ला असणाऱ्या खानापूरमध्ये गटा-तटाच्या राजकारणामुळे नाहक पराभव पत्कारावा लागला. मागील निवडणुकीत लोकवर्गणीतून त्यांनी निवडणूक लढविली. यामुळे समितीकडून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या जोरावर उमेदवारी मिळू शकते. आणि मिळालेल्या संधीच्या माध्यमातून ते नक्कीच चांगली लढत देऊ शकतात यात शंका नाही. समितीमधून रुक्माण्णा झुंजवाडकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत यांनीही आपापल्या परीने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाचे नशीब कुणाला साथ देईल? आणि निवडणूक मंथनातून कोणाचे नाव आघाडीवर येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.