Thursday, April 25, 2024

/

या पत्रकाचा अर्थ काय?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला गटा-तटाची खिंडार पडली असून याचा फटका सीमावासीयांना मागील काही निवडणुकीत बसला आहे. नेत्यांमध्ये पदावरून असलेले अंतर्गत मतभेद याला फटकारत सीमावासीयांकडून समिती नेत्यांना एकी करण्यासाठी तगादा लावण्यात आला.

सीमावासीयांकडून समिती नेत्यांना देण्यात आलेल्या इशाऱ्यातून अखेर खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकीचा निर्धार करण्यात आला. नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हालचाली गतिमान करण्यात आल्या. मात्र, एकीचा हा वज्रनिर्धार वरवर कणखर परंतु आतून पोखरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

खानापूर समितीमधील अविनाश पाटील यांनी आज पत्रक प्रसिद्धीसाठी दिले असून या पत्रकावर नखानापूर समितीत झालेल्या एकीमध्ये आलबेल नसल्याचे जाणवत आहे. वरवर झालेल्या एकीचे राजकारण अंतर्गत मतभेदामुळे पुन्हा उफाळून आल्याचे चित्र दिसत असून विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर समिती कार्यकारिणीने डिपॉझीटच्या स्वरूपात मागितलेल्या निधीवरून पुन्हा मतभेद निर्माण झाले आहेत, हे या प्रसिद्धिपत्रकावरून स्पष्ट होत आहे.

 belgaum

एकीकडे कै माजी आम. अशोक पाटील यांचे चिरंजीव विशाल पाटील यांनी समितीला रामराम ठोकत जेडीएसमध्ये प्रवेश घेतला आणि नासिर बागवान यांची साथ दिली. धनंजय पाटील सायलेंट मोड वर गेले असून अरविंद पाटील यांचा जुना गटदेखील समिती कार्यकारिणीवर ताशेरे ओढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मागील वेळी झालेल्या चुका सुधारून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असताना पुन्हा मतभेद निर्माण करून हाती येणारी सत्ता घालविण्याचे कार्य सध्या समिती नेत्यांमध्ये सुरु आहे त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

आज अविनाश पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, समिती कार्यकारिणीने घेतलेल्या ५१ हजार रुपयांच्या देणगीसंदर्भात विरोध केला असून संघटनेतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक असो किंवा आगामी निवडणुकीसाठी नियमावली डिपॉझिट व देणगी ठरविण्याबाबत ठराविक मंडळीच्या मताने कारभार सुरु असल्याचे म्हटले आहे. सर्वसामान्य माणसांच्या पाठींब्यावर सुरु असलेल्या समितीमध्ये सामान्य माणसाला, कार्यकर्त्याला परवडेल अशाच अटी असाव्या, अवाजवी डिपॉझिट देणगी रक्कम ठरवून सामान्य मराठी कार्यकर्त्याला या निवडणुकीपासून दुर ठेवण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जनतेला विश्वासात न घेता हे सर्व निर्णय घेतले गेले असून आजतागायत मागील निवडणुकीत घेतलेल्या निधीचाही हिशोब अद्याप देण्यात आला नसल्याचे समिती नेत्यांवर अविश्वास दाखविला आहे.

खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन सर्वसामान्य मराठी माणसाला भगव्या झेंड्याखाली एकत्र आणून संघटना मजबूत करण्यासाठी स्वतंत्र गटाची घोषणाही केली आहे. शिवाय या गटाच्या माध्यमातून समिती बळकटीकरण होईल, तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, आणि यादरम्यान समितीला मारक ठरणार नाही असे कोणतेही कार्य आपण करणार नसल्याचे म्हटले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता खानापूर समितीमध्ये झालेल्या एकीलाही तडा गेल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पुन्हा गटा-तटाचे राजकारण उफाळून आले तर आगामी विधानसभा निवडणुकीत समितीला याचा मोठा फटका सोसावा लागणार, हे नक्की.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.