बेळगाव लाईव्ह : बेळगाव प्रशासनाला नेहमीच मराठीची कावीळ होते तर दुसरीकडे निवडणुका जवळ आल्या कि लोकप्रतिनिधींना मराठीची जाग येते. याचा प्रत्यय अनेकवेळा बेळगावकरांनी अनुभवला आहे.
बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीला दुजाभाव दिल्याची बाब समोर आली असून बेळगाव महानगरपालिकेमधील महापौर-उपमहापौर कक्षाबाहेर असलेल्या फलकावर जाणीवपूर्वक मराठीला वगळल्याचे निदर्शनात आले आहे.
६ फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिकेची महापौर-उपमहापौर निवडणूक पार पडली. यानंतर लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले. मनपाचा कारभार सुरळीतपणे सुरु झाला. मात्र महापौर-उपमहापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीलाच मराठीला डावलण्यात आल्याने मराठी भाषिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ज्या भागात १५ टक्क्यांहून अधिक लोक हे एका भाषेचे असतात त्यावेळी त्यांना त्यांच्या भाषेतूनच सर्व व्यवहार करण्याचा हक्क आणि अधिकार देणे हे तेथील प्रशासनाचे कर्तव्य असते. भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने दिलेल्या हक्कानुसार महानगरपालिकेतही हा नियम लागू होणे आवश्यक आहे. मात्र, जाणीवपूर्वक फलकावरून मराठीला डावलण्यात आल्याने मराठी भाषिकातून याचा विरोध व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेत आमदार, खासदारांच्या कक्षाबाहेर मराठी, इंग्रजी आणि कन्नड या तिन्ही भाषेत फलक लावण्यात आले आहेत. मात्र कवळ महापौर-उपमहापौर कक्षाबाहेरील फलकावर मराठीला का डावलण्यात आले? असा संतप्त सवाल मराठी भाषिकातून उपस्थित होत आहे.