बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये येत्या आठवड्याभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी पंत्रप्रधानांचा बेळगाव दौरा, २ मार्च रोजी राजहंसगडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आलेला कार्यक्रम आणि केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले भाजप विजय संकल्प अभियान संदर्भात माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत माजी आमदार संजय पाटील यांनी विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली.
27 फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार आहे. यादरम्यान नूतनीकरण करण्यात आलेल्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम तसेच रोड शोचे ही आयोजन करण्यात आले आहे. यानंतर बी एस. येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी या ठिकाणी व्यासपीठावर भव्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 2 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी विजय संकल्प अभियानाला बेळगाव मध्ये सुरुवात होणार असून खानापूर तालुक्यातील नंदगड गावात क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या समाधीस्थळापासून विजय संकल्प अभियानाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचप्रमाणे २ मार्च रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकारी नियमानुसार राजहंसगडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री आणि गोकाक मतदार संघाचे आमदार रमेश जारकीहोळी यांनीही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. राजकारणातील कट्टर विरोधक असलेले रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर हे दोन्ही नेते २ मार्च रोजी होणाऱ्या राजहंसगडावरील उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसतील का? याबाबत प्रसार माध्यमांमध्ये विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असून आपण या कार्यक्रमास पक्षाच्या आदेशानुसार उपस्थित राहणार असल्याचे जारकीहोळी म्हनाले. शिवाय हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे या भागाच्या आमदार म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर या देखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात होत असलेल्या राजकारणासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आपला विरोध शिवाजी महाराजांच्या मूर्तीला नसून राजहंसगावर सरकारी प्रतिनिधींना डावलून आखण्यात आलेल्या कार्यक्रमाला असल्याचे सांगत अशा लहान-सहान गोष्टींवरून राजकारण करू नये, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ग्रामीण मतदार संघाच्या रणनीतीसंदर्भात मार्च महिन्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर पुन्हा टीकेची झोड सॊडत विकास म्हणजे केवळ रस्ते,गटारी नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेला रमेश जारकीहोळी, संजय पाटील, किरण जाधव, धनंजय जाधव, डॉ. सोनाली सरनोबत, नागेश मन्नोळकर, रामचंद्र मन्नोळकर आदी उपस्थित होते.