बेळगाव लाईव्ह : गेली ३० वर्षे बेळगाव महानगरपालिकेवर मराठी भाषिकांचीच निर्विवाद सत्ता राहिले आहे. म्हनगरपालिकेची निवडणूक पक्षीय चिन्हावर पार पडल्याने सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ तीन पदांवर समाधान मानावे लागले आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून निवडून आलेले बहुतांशी नगरसेवक हे मराठा आणि मराठीशी निगडित आहे. आज पार पडलेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत देखील मराठी भाषिक नगरसेविकांचीच वर्णी लागली असून हिरमोड झालेल्या कन्नड संघटनांचा तिळपापड होत आहे.
बेळगावमध्ये नेहमीच मराठी भाषिकांना दुजाभाव देऊन येनकेन प्रकारे मराठी भाषिकांना त्रास देण्याचे सत्र प्रशासनासहित सर्वच मराठीद्वेष्ट्या संघटनांकडून सुरु असते. सीमाभाग हा बहुल मराठी भाषिकांचा भाग आहे. यामुळे आजतागायत सीमाभागात आमदार, नगरसेवकपदी मराठीभाषिकांचीच सत्ता अबाधित राहिली आहे.
अलीकडे समितीमध्ये झालेल्या फुटीमुळे अनेकांनी राष्ट्रीय पक्षांच्या झेंड्याखाली आश्रय घेतला असला तरी मराठी हा मुद्दा अजूनही ते आपल्या उराशी बाळगून आहेत. हीच पोटतिडिक असल्याने आज कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मनपा आवारात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाने महापौर – उपमहापौर पदी मराठी भाषिक उमेदवार जाहीर केल्याने पोटशूळाने गोंधळ माजविला. मनपा आवारात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या करवे संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मनपा आवारात प्रवेश कारण्यापासून रोखले. यामुळे याठिकाणी काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.
कन्नड भाषिक नगरसेवकांना महापौर,उपमहापौर पदाची संधी द्यायला हवी होती या भावनेतून गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांवर दबावसत्र सुरु होते. मात्र, या दबावाला झुगारून अखेर भाजपने मराठी भाषिकांनाच संधी दिली. यामुळे लोकप्रतिनिधींवरही तोंडसुख घेण्यास करवेने कोणती कसर सोडली नाही!