Friday, April 19, 2024

/

‘म्हादाई’ वाचवा : अ.भा.साहित्य संमेलनात ठराव संमत

 belgaum

वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘म्हादाई’ वाचविण्याबाबत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक रमेश वसकर यांनी हा ठराव मांडला, तर राजमोहन शेट्ये यांनी त्याला अनुमोदन दिले.

ठरावात म्हंटले आहे की, प्रामुख्याने गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचे पात्र कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी वळविण्याचा प्रयत्न होतो आहे.

सदर नदी वळविल्यास गोव्यात पाण्याची तीव्र टंचाई होणार असल्यामुळे नदीचे पात्र वळवू नये, अशी विनंती केंद्र सरकारला करावी.
गोव्याची जीवनदायिनी असणारी म्हादई नदी महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवाहित होते.

नैसर्गिकरीत्या गोवा आणि महाराष्ट्र या नदीच्या पाण्यावर विसंबून आहेत. तरीही कर्नाटक हे महाराष्ट्र व गोवा राज्याच्या नैसर्गिक हक्कांवर गदा आणत आहे. म्हादई गोव्यातून 70 टक्के, कर्नाटकातून 24 टक्के आणि महाराष्ट्रातून 6 टक्के वाहते. कळसा- भांडुरा प्रकल्पाच्या नावाने म्हादईचे पाणी वळवल्यास गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि जैवसंपदेवर मोठा परिणाम होईल.

गोव्यावर पाण्याचे संकट कोसळून जनजीवन विस्कळीत होईल. म्हादईचे पाणी न वळविण्याचा विचार या साहित्य मंचावरून व्हावा, तसेच कर्नाटक सरकारच्या डीपीआरला दिलेली मान्यता रद्द करून गोवा आणि महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला विनंती करावी, असा तपशील ठरावात नमूद आहे. या ठरावाचे साहित्य संमेलनाच्या मंचावर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.