राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली असून महापौरपदी शोभा सोमानाचे यांची तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे. या पद्धतीने बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर व उपमहापौर पदी मराठी भाषिक महिलांची निवड झाली आहे.
काँग्रेसने आज सोमवारी सकाळी महापौर निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. याखेरीज महापौर निवडणुकीसाठी भाजपच्या अनगोळच्या प्रभाग 57च्या नगरसेविका शोभा मायाप्पा सोमनाचे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता परिणामी शोभा सोमनाचे यांची बेळगाव महापौर पदी निवड झाली.
उपमहापौर पदासाठी नगरसेविका प्रभाग 33च्या रेश्मा प्रवीण पाटील आणि नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे अशा दोघाजणांनी अर्ज केले होते. यापैकी निवडणुकीमध्ये वैशाली भातकांडे यांना 4 मते तर रेश्मा पाटील यांना 42 मते पडली. त्यामुळे रेश्मा पाटील या 38 मतांच्या मोठ्या फरकाने उपमहापौर पदी निवडून आल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीनही नगरसेवकांनी मतदान केले मात्र नगरसेविका भातकांडे यांना चौथेही मत पडले.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ यांनी प्रसार माध्यमांना निवडणूक निकालाची माहिती दिली. सदर माहिती देताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेपूर्वी सर्व नगरसेवकांचा शपथविधी पार पडल्याचेही सांगितले.
दरम्यान, बेळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रियेस वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या 3 नगरसेवकांना सभागृहाबाहेरच रोखण्यात आल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. महापौर आणि उपमहापौर पदाची मुख्य निवडणूक प्रक्रिया दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार होती. या संदर्भात सर्व नगरसेवकांना कल्पना देण्यात आली होती.
मात्र कांही कारणास्तव नगरसेविका खुर्शिदा मुल्ला, नगरसेविका झरीन फतेखान व नगरसेवक सोहेल संगोळ्ळी या तिघा जणांना महापालिकेत पोहोचण्यास 3 मिनिटे उशीर झाला.त्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश न देता बाहेरच रोखण्यात आले. निवडणुकीसाठी सभागृहात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या या तीनही नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन छेडून निषेध नोंदविला.
ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ನೂತನ ಮೇಯರ್ ಆಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವ ಶ್ರೀಮತಿ ಶೋಭಾ ಸೊಮನ್ನಾಚೆ ಹಾಗೂ ಉಪಮೇಯರ್ ಆಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವ ಶ್ರೀಮತಿ ರೇಷ್ಮಾ ಪಾಟೀಲ್ ರವರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಹಾಗೂ ಸಮಗ್ರ ಗಡಿನಾಡ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸದಾ ಬದ್ಧವಾಗಿದೆ. @BJP4Karnataka pic.twitter.com/oeS7YadiZr
— Basavaraj S Bommai (@BSBommai) February 6, 2023