बेळगाव लाईव्ह : खेळाडूंनी मेहनत घेतली की त्यांना यश हे मिळतेच. आजपर्यंत शारीरिक क्षमता (स्टॅमिना) उत्तम ठेवण्यासाठी मी घेतलेले कठोर परिश्रम माझ्या त्या झेला मागच्या यशाचे मुख्य कारण आहे. मी नेहमीप्रमाणे स्फूर्तीने तो कठीण झेल शिताफिने टिपला. मात्र, नेमका हाच व्हिडिओ व्हायरल होऊन मला इतकी प्रसिद्धी मिळेल असे वाटले नव्हते! हे उद्गार आहेत किरण तळेकर या क्रिकेटपटूचे!
ज्याच्या एका झेलामुळे बेळगावचे टेनिस बॉल क्रिकेट जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंसह क्रीडा प्रेमींना माहित झाले, तो साईराज ‘अ’ संघातील वडगावचा किरण तळेकर कोण आहे? हे सर्वांना कळावे यासाठी श्री मंगाई देवी मैदानाच्या ठिकाणी व्हॅक्सिन डेपो मैदानावरील श्री चषक टेनिसबॉल क्रिकेट सामन्यात सीमारेषेवर अफलातून झेल टिपून बेळगाव टेनिसबॉल क्रिकेट जगभर पोहोचवणाऱ्या किरण तळेकर या क्रिकेटपटूची आज ‘बेळगाव लाईव्ह’ ने मुलाखत घेतली.
यावेळी आपण टिपलेला झेल आणि त्यानंतर खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह जगभरात आपल्याला मिळालेली प्रसिद्धी यावर दिलखुलासपणे किरण तळेकर याने प्रतिक्रिया व्यक्त केली.
श्री स्पोर्ट्स खडक गल्लीतर्फे नुकत्याच पार पडलेल्या श्री चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या एसआरएस संघाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात साईराजच्या किरण तरळेकर याने सीमारेषेनजीक अप्रतिम झेल टिपला होता. या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, भारताचा मातब्बर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वाॅन, न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जिमी निशम, भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू मुनाफ पटेल आदींनी तो व्हिडिओ शेअर केला होता.
एवढेच नव्हे तर मुंबई इंडियन्स संघाने देखील आपल्या ऑफिशियल पेजवर हा झेल शेअर केला होता. हे कमी होते म्हणून की काय ऑस्ट्रेलियाची सुप्रसिद्ध क्रीडा वाहिनी फॉक्स स्पोर्ट्स चॅनलने देखील किरण तळेकर याने सीमारेषेवर टिपलेल्या झेलाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या पद्धतीने आपल्या एका झेलाद्वारे बेळगावचे टेनिस क्रिकेट जगभरात सुपरिचित करणारा किरण तळेकर ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना म्हणाला की, क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला झेल हा पकडावाच लागतो. मात्र मी इतकेच सांगेन की मी आजवर घेतलेल्या मेहनतीचे फळ परवाच्या त्या झेलमुळे मला मिळाले. खेळामध्ये शारीरिक तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाची असते मी स्वतः फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या वगैरे आवश्यक सर्व क्रीडा प्रकार करतो, त्यामुळेच माझी शारीरिक क्षमता (स्टॅमिना) चांगली आहे. मी नेहमीप्रमाणे तो कठीण झेल शिताफिने टिपला. मात्र त्यामुळे त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊन मला इतकी प्रसिद्धी मिळेल असे वाटले नव्हते. माझ्या झेलाबद्दल खुद्द सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केल्याचे काल अंतिम सामन्याप्रसंगी मला कळाले. त्यावेळी क्रिकेटसाठीची माझी मेहनत सफल झाल्याची भावना मनात येऊन मी भरून पावलो, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
आजच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंनी देखील हि बाब लक्षात ठेवावी असे त्याने सांगितले. खूप मेहनत घेतली की यश मिळते ,नावलौकिक मिळतो हे लक्षात ठेवले पाहिजे असे सांगून मी स्वतः त्यासाठी मार्गदर्शन करायला तयार आहे. माझ्यापेक्षा दर्जेदार खेळाडू निर्माण हवेत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असे वडगावच्या श्री मंगाई देवी मैदानावर क्रिकेटर म्हणून तयार झालेल्या किरण तळेकर याने स्पष्ट केले. किरण तळेकर हा स्वतः क्रीडा शिक्षक असून त्याने बीपीएड व एमपीएड शिक्षण पूर्ण केले आहे हे विशेष होय.