महाराष्ट्र -कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.
सध्या महाराष्ट्र शासनाकडून सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना दरमहा 10 हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जात असून ते आता दरमहा 20 हजार इतके करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाने काल मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्र -कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना 21 एप्रिल 2014 पासून दरमहा 10 हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या वारसांना स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे लाभही देण्यात येतात. हुतात्म्यांच्या कुटुंबातील हयात विधवा पत्नी, आई किंवा वडील यापैकी एकास निवृत्ती वेतन दिले जाते. आता जवळपास 8 वर्षानंतर निवृत्तीवेतनाची ही रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या 1 नोव्हेंबर 2022 पासून ही निवृत्तीवेतन वाढ लागू आहे. बेळगाव जिल्ह्यातील 11 तर मुंबईतील 67 वारसांना या वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ होणार आहे.