सालाबाद प्रमाणे श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव यांच्यातर्फे आयोजित श्री समादेवी जयंती उत्सवाला आज बुधवारपासून भक्तिभावाने प्रारंभ झाला असून येत्या शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणाऱ्या या उत्सवांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. तेंव्हा वैश्यवाणी समाज बांधव व भक्त मंडळींनी बहुसंख्येने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समादेवी गल्ली येथील श्री समादेवी मंदिरामध्ये आज बुधवारी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत चौघडा व काकड आरती कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कुमकुमार्चन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या दरम्यान श्री समादेवी देवी दरबाराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. अंजली जोशी यांच्या हस्ते पार पडले. आता दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत प.पू. श्री कलावती माता यांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर अनुक्रमे विवेकानंद भजनी मंडळ, झंकार भजनी मंडळ, ओंकार भजनी मंडळ आणि सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत स्वरगंध भजनी मंडळ यांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
भजनाच्या कार्यक्रमादरम्यान सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत मुलांसाठी स्पर्धा घेतल्या जातील. त्यामध्ये वेशभूषा, श्लोक पठण, राष्ट्रपुरुषावर भाषण आदी स्पर्धांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धाकांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दि 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजता होणार आहे.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्या गुरुवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत चौघडा व काकड आरती होईल. त्यानंतर सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत लक्ष पुष्पार्चन होईल. त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमानंतर सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत माधव कुंटे यांचा ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ हा तुफान विनोदी एकपात्री कार्यक्रम होणार आहे.
तिसऱ्या दिवशी शुक्रवार दि 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत चौघडा व काकड आरती झाल्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत श्रीला महाअभिषेक केला जाईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रींना मिष्टान्न व महानैवेद्य दाखवला जाईल. या कार्यक्रमानंतर दुपारी 2 वाजल्यापासून ओटी भरणे कार्यक्रम सुरू होईल. पुराण वाचनाचा कार्यक्रम दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत होणार असून सायंकाळी 4 वाजता श्री ची पालखी प्रदक्षिणा प्रारंभ होईल. तसेच रात्री 8 वाजता श्रीच्या भांडारातील देवीला परिधान केलेल्या साड्या, खण व देवी समोरील श्रीफळे तसेच देवीकडील फळफळावळे जाहीररित्या जास्तीत जास्त मागणी करणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येईल.
पालखी प्रदक्षिणेनंतर मुख्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके, कर्नाटक देवालय संवर्धन समितीचे राज्य संयोजक मनोहर मठत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शनिवार दि 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 ते 11 वाजेपर्यंत नवचंडीका होमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या होमानंतर श्री समादेवी सभागृह बेळगाव येथे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे, तेंव्हा दरवर्षीप्रमाणे वैश्यवाणी समाज बांधवांसह शहरातील भक्तांनी या श्री समादेवी जयंती उत्सवाचा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे असे आवाहन श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्य समाज महिला मंडळ, वैश्यवाणी युवा संघटना आणि नार्वेकर वैश्य शिक्षण फंड बेळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.