बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणात आणण्यात महापालिकेला अद्याप यश आले नसल्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला असून भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक 3 वर्षाचे बालक जखमी झाल्याची घटना आज अनगोळ येथे घडली.
याबाबतची माहिती की, अनगोळ येथील 20 नंबर शाळेसमोरील परिसरात शिवम नावाच्या 3 वर्षीय बालकावर आज शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिवम जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे शिवमच्या हातापायासह पाठीला जखमा झाल्या आहेत. सदर प्रकाराची माहिती मिळताच माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तसेच जखमी शिवम या बालकाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले आहे. बेळगाव महापालिकेने भटक्या कुत्र्यांविरुद्ध मोहीम उघडली असली तरी शहरातील या कुत्र्यांचा उपद्रव अद्यापही कमी झालेला नाही.
बेवारस कुत्र्यांनी बालकावर हल्ला करण्याच्या अनगोळ येथील आजच्या घटनेमुळे महापालिकेने शहरातील उपद्रवी भटक्या कुत्र्यांचा युद्धपातळीवर बंदोबस्त करावा, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. बेळगाव मनपाला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे.भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी माजी नगसेवक विनायक गुंजटकर यांनी केले आहे.