बेंगलोर महानगर परिवहन महामंडळाने (बीएमटीसी) वापरलेल्या जवळपास 20 जुन्या बस गाड्या री-ब्रँडिंगनंतर आता कर्नाटक वायव्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागात तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र शहर बस सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या या जुन्या बीएमटीसी बसेस वारंवार बंद पडून त्रासदायक ठरत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बीएमटीसीने जवळपास 60 जुन्या नॉन -एसी बसगाड्या वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाला (एनडब्ल्यूकेआरटीसी) दिल्या असून प्रत्येक बससाठी 50 हजार ते 1 लाख रुपये किंमत आकारली असल्याचे कळते. जुन्या बस गाड्या वारंवार बंद पडत असल्यामुळे किती त्रासदायक ठरतात हे सर्वश्रुत आहे. त्याची प्रचिती एनडब्ल्यूकेआरटीसीकडून बेळगाव शहरातील बस मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू केलेल्या जुन्या बीएमटीसी बसेसच्या बाबतीत येत आहे.
सदर बसेस या ना त्या कारणास्तव बिघाड निर्माण होऊन भर रस्त्यात बंद पडत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बीएमटीसीने अतिशय हुशारीने आपल्याकडील जुन्या बसेस खपवल्या आणि एनडब्ल्यूकेआरटीसीने मूर्खासारख्या त्या स्वीकारल्या असल्या तरी त्या मूर्खपणाची किंमत बेळगावकरांना मोजावी लागत आहे.
सध्या रोजच्या रोज वाटेतच बंद पडणाऱ्या बस गाड्यांमुळे प्रवासी वर्ग वैतागून गेला आहे. तसेच आतून जीर्ण झालेल्या, मुदत संपलेल्या या बस गाड्यांचे रस्त्यावरून कायमचे उच्चाटन केले जावे, अशी मागणी केली जात आहे.