बेळगाव लाईव्ह : स्वयंपाकाच्या तेलाचे डबे चोरून अन्यत्र विक्री करण्यासाठी नेत असलेल्या जोडगोळीला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
उडुपी जिल्ह्यातील पडुबिद्री येथील इस्माईल इब्राहिम नवास (वय ४३) यांच्या ट्रकमधून नेण्यात येत असलेले चोरीचे खाद्यतेल जप्त करून इब्राहिम अल अब्दुलमजीद आणि साहेबअल हुसेन (दोघेही राहणार आसाम) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
२४,२३,५६० रुपये किमतीचा ऐवज आरोपीकडून हिरेबागेवाडी पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळुरूहून बेळगाव आणि निपाणी येथे विक्री करण्यासाठी आणण्यात येत असलेले ३०,३८,२७६ रुपये किमतीचे १४६५ डबे आणि ८० तेल पाकिटे पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली असून याबाबत अधिक तपास पोलीस घेत आहेत.
सदर प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी गोपालकृष्णन गौडर (एसीपी बेळगाव ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडी पोलीस स्थानकातील पीआय अमरेश बी. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हि कारवाई केली आहे. दोन्ही आरोपींचा शोध घेत २३,९३,५६० रुपये किमतीचे तेल आणि ३०००० रुपये किमतीची दुचाकी असा एकूण २४,२३,५६० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली असून या कारवाईत सहभागी झालेल्या पीआय अमरेश बी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी आणि डीसीपींनी कौतुक केले आहे.