बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात वारंवार लांबणीवर पडत असलेली सुनावणी बुधवारी (ता. ८) होणार आहे. पण या खटल्यातील त्रिसदस्यीय खंडपीठात पुन्हा एकदा कर्नाटकच्या न्यायमूर्ती यांची नियुक्ती झाली असल्याने सुनावणी होणार की लांबणीवर पडणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यापूर्वी झालेल्या २ ते ३ सुनावणीदरम्यान कर्नाटकाच्या न्यायाधीशांचीच त्रिसदस्यीय खंडपीठात नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वीदेखील वारंवार सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. शिवाय बुधवारी होणाऱ्या सुनावणीदरम्यानही कर्नाटकचे न्यायाधीश काम पाहणार असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सीमा खटल्यात नवे खंडपीठ स्थापन करण्यात आले होते. पण आता पुन्हा नव्या खंडपीठात पुन्हा कर्नाटकच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाने सर्वतोपरी तयारी केली असून सीनियर कौन्सिलर वैद्यनाथन आणि राकेश द्विवेदी यांच्यासमोर ब्रिफिंग करण्यात आलेले आहे.
बुधवारी (दि. ८) कर्नाटक सरकारच्या 12 या अंतिम अर्जावर सुनावणी होणार आहे. या अर्जात, सीमाप्रश्न सोडवण्याचा अधिकार संसदेला आहे, सुप्रीम कोर्टाला नाही, असा दावा करण्यात आला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मात्र खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या त्रिसदस्यीय खंडपीठात कर्नाटकाच्या न्यायमूर्तींच्या समावेश असल्या कारणाने हि सुनावणी होणार कि लांबणीवर पडणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे. बुधवारच्या सुनावणीकडे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.