बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठी भाषिक जनता कर्नाटक सरकारच्या अन्यायाखाली भरडत आहे. या अन्यायातून मुक्त होऊन महाराष्ट्रात जाण्याची तळमळ ठेवून सातत्याने ६६वर्षे लढा जिवंत ठेवणाऱ्या सीमावासियांच्या आपल्याला कौतूक आहे, हा लढा लवकरात लवकर संपुष्टात यावा आणि प्रत्येक मराठी भाषिकाला त्याच्या मनाप्रमाणे महाराष्ट्रात सामील होता यावे आणि सीमालढ्याचा प्रश्न यशस्वीपणे सर्वोच्च न्यायालयात सुटावा यासाठी सीमावासीयांनी एकजुटीने राहणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्रातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
मुंबई आझाद मैदानावर सुरु असलेल्या धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावरून उपस्थितांना उद्देशून ते बोलत होते. आजवर देशात अनेक लढे, आंदोलने उभारली गेली.मात्र सातत्याने ६६ वर्षे महाराष्ट्रात सामील होण्यासाठी सुरु असलेला संघर्षाचा सीमालढ्याचा तिढा अजूनही सुटला नाही. या लढ्यातील सर्वांचे योगदान, नेत्यांची भूमिका, लढ्याचे नेतृत्व करणारे आणि लढा पुढे घेऊन जाणारे या सर्वांचे आपल्याला कौतुक असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. देशाच्या इतिहासात इतका दीर्घकाळ लढा दुसरा कोणताही झाला नाही. इतकी वर्षे अन्याय झेलुनही तीव्र संघर्ष करत लढा सुरु ठेवणाऱ्या सीमावासीयांना दिल्ली आणि महाराष्ट्रातील सरकार कितपत न्याय देईल? याबाबत शंका वाटत असल्याचे ते म्हणाले. तिन्ही ठिकाणी भाजप सरकार आहे. आणि भाजप सरकारकडून जनतेमध्ये फूट पडून ब्रिटिशांप्रमाणे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला.
ज्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो त्याबाबत महाराष्ट्रातील नेते मान खाली घालून गप्प बसतात याहून दुर्दैव नाही. कर्नाटकातील सरकार महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव करते. मात्र याबाबत महाराष्ट्रातील सत्ताधारी तोंडही उघडत नाहीत. कर्नाटकात राज्यकर्त्यांची दहशत माजली असून मराठी जनतेत फूट पाडण्याचे काम राष्ट्रीय पक्ष करत असल्याचे भास्कर जाधव यांनी निक्षून सांगितले. इतकेच नव्हे तर इंग्रजांपेक्षाही भयानक राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
सीमालढ्याचा तिढा सुटण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी सीमावासीयांनी एकजूट राखावी, एकीमध्ये फूट पडणार नाही याची दक्षता घ्यावी, एकीमुळे कुणालाही झुकवणे शक्य होईल, आणि सीमालढा नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना हि नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी असून कर्नाटक सरकारने कितीही बंदी घातली तरीही सीमावासियांच्या हाकेला मी नेहमी हजर असेन, कोणाच्या बापालाही आपण घाबरणार नाही!असे आश्वासन भास्कर जाधव यांनी दिले.