जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संथगतीने सुरु असलेली कामे येत्या दोन दिवसात पूर्ण न केल्यास कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ मध्ये घालण्याचा कडक इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी आवारातील तसेच इतर रस्त्यांची कामे गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून संथगतीने सुरु आहेत. यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या अर्धवट स्थितीतील कामकाजामुळे लहान – मोठे अपघात घडत आहेत.
या मार्गावरून अनेक दुचाकीस्वार महिलांचा अपघात झाला असून सदर कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन बेळगावमधील वकिलांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी वकिलांनी सदर अर्धवट स्थितीतील रस्त्याच्या विकासकामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देत कामकाज शक्य तितक्या लवकर पूर्ण करून नागरिकांना त्रासातून मुक्त करण्याची विनंती केली.
या मार्गावरून दररोज प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी याच मार्गावरून ये जा करतात. मात्र, कंत्राटदाराविरोधात कारवाई केली जात नाही. आठवड्याभरात कामकाज पूर्ण न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकून वकिलांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर यांनी दिला.
निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी, संबंधित विकासकामे येत्या दोन दिवसात पूर्ण न झाल्यास कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचा आदेश दिला. यावेळी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, ऍड. अण्णासाहेब घोरपडे, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. एम. एस. नंदी, ऍड. देसाई, ऍड. नलवडे, ऍड. सरिता आदींसह इतर वकील उपस्थित होते.