बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणूक तयारीला वेग आला असून प्रशासकीय पातळीवर बैठक आणि नियोजन सुरु झाले आहे. त्याला जोडून मतदार यादी तयार केली जात असून मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंकशी जोडण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
केंद्र सरकारने निवडणूक सुधारणा विधेयक गेल्यावर्षी संमत केले असून या विधेयकाला सभागृहात मंजुरी मिळाली आहे. यानुसार मतदार ओळख पात्र ‘आधार’ला लिंक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रणाली उपलब्ध असून आपल्या सोयीनुसार सदर प्रणाली स्वीकारून लिंक करून घेता येणे शक्य आहे.
या प्रक्रियेमुळे एका व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र असलेल्यांचा शोध घेणे शक्य होणार आहे. दरम्यान, निवडणूक विभागाकडून प्रशासकीय पातळीवर हि प्रक्रिया सुरु आहे. पण, या प्रक्रियेद्वारे मतदारांची मोटबांधणीसाठी राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते स्वारस्य दाखवत आहेत. मतदान ओळखपत्राला आधारकार्ड लिंक करून देत मतदारांवर भूरळ पाडली जात आहे.
१८ पेक्षा अधिक किंवा निवडणूक घोषणा होईपर्यंत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या युवा मतदारांचा समावेश मतदार यादीत केला आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदार ओळखपत्राला आधारकार्डशी लिंक केली जात आहे. यंदा पहिल्यांदा प्रक्रिया हाती घेतली असून, त्याला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
निवडणूक विभागातर्फे प्रक्रिया पार पाडण्यात येत असून गेल्या महिन्यांपासून विशेष अभियान सुरु आहे. मात्र, या माध्यमातून मतदारांची मोटबांधणी केली जात आहे. मतदारांशी संपर्क किंवा घरोघरी मतदार ओळखपत्राला आधारकार्डशी लिंक करून दिली जात आहे, हे विशेष!