कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी यात्रेसाठी विविध भागातील नागरिकांनी प्रस्थान केले आहे. डिसेंबर महिन्यात कंकण-मंगळसूत्र विसर्जन विधी आणि शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणारा देवीचा विवाह सोहळा या अनुषंगाने पूर्वापारपासून बैलगाडीने यात्रेला जाण्याची परंपरा चालत आली आहे.
शेकडो वर्षांपासून सुरु असलेली हि परंपरा आजही बेळगावमधील अनेक ठिकाणी पाळली जाते. तालुक्यातील अनेक भागातून बैलगाडीच्या माध्यमातून अनेक भाविक यल्लम्मा डोंगरावर रवाना होतात. बेळगावमधील अनेक ठिकाणाहून गेल्या २-४ दिवसांपासून भाविकांनी प्रस्थान करण्यास सुरुवात केली आहे. येत्या ६ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने हि यात्रा पार पडणार आहे.
आधुनिकीकरणाच्या या युगात आजही बैलगाडीतून यात्रेला जाण्याची परंपरा हि कौतुकास्पद आहे. सौंदत्ती येथे जाण्यासाठी भाविकांसाठी अनेक वाहने उपलब्ध आहेत. परिवहन मंडळाकडून यात्राकाळात अधिक बससेवा पुरविली जाते. अलीकडे अनेक नागरिक खाजगी वाहनातून देखील डोंगरावर रवाना होतात. मात्र बैलगाडीतून यात्रेला जाण्याचा अनुभव हा इतर कशातूनही येत नाही
. शिवाय बैलगाडीतून जाणे हे वाहनांपेक्षा अधिक खर्चिक देखील असते. संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आज बेळगावमधील ज्येष्ठ नागरिक हा वारसा पुढील पिढीकडे सोपवत आहेत. पूर्वी दळणवळणाच्या मुबलक सुविधा उपलब्ध नसल्याने सजवलेल्या बैलगाडीतून सौंदत्ती यात्रेला जाण्याची परंपरा सुरु झाली. मात्र आजही शहर आणि तालुक्यातील भाविक हि परंपरा कायम ठेवून सौंदत्ती यात्रेसाठी रवाना होत आहेत. आता अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध असूनही बैलगाडीतून जाणाऱ्या भाविकांचा उत्साह पूर्वीसारखाच कायम टिकून आहे.
निसर्गाच्या सानिध्यात, बैलगाडीच्या माध्यमातून स्वतःसोबत घेऊन गेलेल्या शिदोरीचा आस्वाद घेत बैलगाडीचा प्रवास करणे हि परंपरा रयत गल्ली, होसूर गल्ली यासह अनेक ठिकाणचे भाविक कायम जपत आहेत. सजवलेल्या बैलगाडीसह अनेक भाविक रेणुका देवीच्या दर्शनासाठी रवाना होतात. ‘उदो ग उदो आई’चा गाजर करत भाविक सौंदत्ती डोंगराकडे रवाना होतात. यावेळी धार्मिक वातावरण निर्माण होऊन भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. यानिमित्ताने बेळगावकरांची बैलगाडीतुन जाण्याची धार्मिक परंपरा कायम असल्याचे अधोरेखित होते.
बेळगावहून बैलगाडीतून निघालेले भाविक २-३ दिवसात जोगनभावी येथे दाखल होतात. त्यानंतर सौंदत्ती डोंगरावर विधिवत पडली पूजनाचा कार्यक्रम होतो आणि देवी दर्शनानंतर पुन्हा सर्व भाविक बेळगावमध्ये ठराविक ठिकाणी येऊन थांबतात. त्यानंतर पुन्हा याठिकाणी विधिवत पडली पूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आपापल्या घरी परततात, अशी परंपरा आहे.
या कालावधीत सजवलेल्या बैलगाडीमध्ये स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य, बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था, रात्रीच्या वेळी ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, भाविकांची विश्रांती आणि पुन्हा सकाळी लवकर उठून ठरलेला पल्ला गाठण्यासाठी रेणुकादेवीच्या जयघोषात पुढच्या मार्गाकडे रवाना होणारी बैलगाडी यात्रा हा अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय असा असतो. या माध्यमातून भाविकांचा भक्तिभाव व अमाप उत्साह देखील दिसून येतो.
बैलगाडीचे वेगळेपण हे भक्तिभावाचे पवित्र दर्शन घडविणारे आहे. सौंदत्ती रेणुका देवीवरील भाविकांची अतूट श्रद्धा व देवीच्या दर्शनासाठी यात्रेकरूंचा असलेला अमाप उत्साह हा धार्मिक परंपरा जोपासणारा असल्याचे दर्शन घडविणारा आहे.