बेळगाव लाईव्ह : प्रत्येक राजकारणी आणि ‘लोक’प्रतिनिधींना निवडणुकीचे वेध लागले आहेत. कित्येक राजकारणी मतदारसंघातील विकासकामांकडे दुर्लक्ष करून भेटवस्तू देण्यात दंग झाले आहेत. मात्र ग्रामीण भागातील बहुतांशी गावातील बससुविधेसाठी टाहो फोडणाऱ्या नागरिकांकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागात अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे हाल होत असून याबाबत अनेकवेळा निवेदने, मोर्चे, रास्ता रोको यासारख्या माध्यमातून निषेध व्यक्त होऊनही अद्याप ग्रामीण भागातील नागरिक बससुविधेपासून वंचित आहेत. परिणामी खाजगी वाहनातून प्रवास करत आपला जीव धोक्यात घालून विद्यार्थी प्रवास करताना दिसत आहेत.
शहर परिसरात शाळा-महाविद्यालये आणि खाजगी क्लासेससाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य बससुविधा उपलब्ध नसल्याकारणाने बसच्या प्रवेशद्वारातच लोंबकळत विद्यार्थ्यांना उभं राहावं लागत. हे चित्र कित्येकदा समोर आलं असून याबाबत प्रसारमाध्यमांनी देखील अनेकवेळा आवाज उठविला आहे. सोशल मीडिया वेगवान झाल्याने अशा प्रकारचे व्हिडीओ, फोटोदेखील वायरल होतात, याचा निषेध नोंदविला जातो. मात्र याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष कधी जाते, ना परिवहन मंडळाचे, ना प्रशासनाचे! स्वतःच्या गर्तेत दंग असलेल्या या साऱ्यांना विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजेबाबत यत्किंचितही फरक पडत नाही.
गेल्या पंधरवड्यात पश्चिम ग्रामीण भागातील नागरिकांनी पत्रकाच्या माध्यमातून अपुऱ्या बससुविधेबाबत लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविला. तातडीने यावर अंमल करून बससुविधा पुरविण्याबाबत विरोधी पक्षातील उमेदवारांनी ‘ऍक्शन’ घेतली. मात्र ‘ऍक्शन’ आणि ‘रिऍक्शन’ या दोन्हीही कागदावरच राहिल्या. आजचे विद्यार्थी हे उद्याचे मतदार आहेत, निदान या भूमिकेतून तरी लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांनी या समस्येकडे जाणीवपूर्वक आणि गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
आपल्या जिल्ह्यातील शैक्षणिक गरजांचे भान ठेवून प्रशासनाने याबाबत जागरूक राहून विद्यार्थ्यांच्या या मूलभूत गरजेकडे लक्ष पुरविणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र अशा गोष्टींसाठीही प्रशासनाकडे निवेदनाचा भडीमार करावा लागतो आणि निवेदन, तक्रारीचा पाऊस पाडूनही प्रशासन याकडे कानाडोळा करते हे दुर्दैव म्हणावे लागेल.
प्रशासन, लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते यांच्यामध्ये भरडला जाणारा विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी दररोज तारेवरची कसरत करत आहे. आपला जीव मुठीत नव्हे तर टांगणीला टाकून प्रवास करत आहे, याकडे कोण गांभीर्याने लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हेल्मेट सक्ती, रस्त्याच्या आड उभं राहून छोट्यामोठ्या गोष्टींसाठी वाहनचालकांना अडवून केली जाणारी दंडात्मक कारवाई, वाहतुकीच्या नियमांवरून सर्वसामान्य नागरिकांना धारेवर धरून करण्यात येणारी सक्ती अशा अनेक गोष्टी करण्यासाठी प्रशासनाकडे वेळ आणि जागरूकता आहे. तर मग सर्वसामान्य नागरिकांच्या अशा मूलभूत गरजेकडे प्रशासनाचे इतके दुर्लक्ष कसे? असा प्रश्नही जनतेतून विचारला जात आहे.
रिक्षा, टमटम, टेम्पो यासारख्या खाजगी वाहनचालकांनाही परिस्थितीचे गांभीर्य नाही. अधिक प्रवासी वाहनातून भरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे हा देखील गुन्हा आहे. रहदारीच्या नियमाविरोधात होणारी बाब आहे. अशा खाजगी वाहनचालकांनाही जरब बसविणे महत्वाचे आहे. शिवाय आपल्या पाल्याला शाळेत किंवा महाविद्यालयात पाठविताना पाल्याच्या सुरक्षिततेची खात्री आणि जबाबदारी पालकांनी ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे.
अलीकडे बेळगावमधील रहदारी जशी वाढली आहे तशी अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रशासन, राज्यकर्ते आणि विद्यमान लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील अशा सुविधेकडे गांभीर्याने लक्ष पुरवून विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविणे गरजेचे आहे.