बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि बेळगाव परिसरात जरी प्लास्टिक बंदी झाली असली तरी अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. शासनाबरोबरच नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर कमी करणे गरजेचे आहे. प्लास्टिक मुळे पर्यावरणाची हानी होतेच आहे. याचबरोबर पुढील पिढीसाठी प्रदूषणयुक्त पर्यावरण निर्मितीदेखील होत आहे.
अनेक ठिकाणी फेकण्यात आलेल्या प्लास्टिकमुळे भटक्या जनावरांनाही याचा फटका बसत आहे. उघड्यावर अन्न खाणाऱ्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने अनेक मुक्या जनावरांचा जीव दगावला आहे. प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे माणसाच्या अनारोग्याचा धोकाही उद्भवत आहे.
रस्त्यावरील विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक सर्रास प्लास्टिकचा वापर करताना आढळून येतात. मनपाची प्लास्टिक बंदी मोहीम ज्यावेळी अमलात आणली जाते, त्यावेळी या विक्रेत्यामध्ये आणि व्यावसायिकांमध्ये सतर्कता निर्माण होते आणि काही काळापुरता प्लास्टिकचा वापर टाळला जातो.
मात्र ज्यावेळी मनपाची प्लास्टिक बंदी मोहीम रखडते, त्यावेळी पुन्हा एकदा अशा प्लास्टिकचा वापर सुरू केला जातो. सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच धर्तीवर महानगरपालिकेने मध्यंतरी प्लास्टिक बंदी मोहीम देखील हाती घेतली. मात्र, ही मोहीम अर्ध्यावरच सोडून देण्यात आल्याने पुन्हा बेळगाव मधील प्लास्टिकचा वापर वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘सिंगल युज प्लास्टिक’ वर आधीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अनेक व्यावसायिक, व्यापारी सिंगल युज प्लास्टिकची विक्री करत आहेत. हि विक्री आणि सिंगल युज प्लॅस्टिकच्या उत्पादनावरच बंदी घालण्यात आली तर पुढील धोका टाळता येणे शक्य आहे.
पर्यावरणाला गिळंकृत करत चाललेल्या प्लास्टिक सारख्या महाराक्षसाला वेसण घालण्यासाठी प्रशासनाने आजवर अनेक प्रयत्न केले आहेत. जागतिक पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी प्लास्टिक हे देखील महत्त्वाचे कारण आहे. आज जगभरात प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक व्यावसायिक आणि व्यापारी अद्यापही प्लास्टिकची साथ सोडायला तयार नाहीत. देशभरात अनेक ठिकाणी ‘नो प्लास्टिक’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, बेळगावमध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
प्लास्टिकला पर्याय म्हणून अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र, याबाबत जनजागृती न झाल्याने प्लास्टिकचे जणू व्यसनच नागरिकांना लागल्याने अनेक नागरिक पर्यायी गोष्टीचा विचार करताना दिसून येत नाहीत. दैनंदिन वापराच्या बहुतांशी वस्तूंना प्लास्टिकचे आवरण असते. या प्लास्टिकची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात न आल्याने पुढे पर्यावरणावर याच प्लास्टिकमुळे मोठा परिणाम होतो. टाकाऊ प्लास्टिक वर प्रक्रिया करणे, त्याचबरोबर त्याचा पुनर्वापर करणे याबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था आणि याबाबतची माहिती नागरिकांना नसल्यामुळे दिवसेंदिवस प्लास्टिकचा विळखा पर्यावरणाच्या भवतीने वाढत चालला आहे.
लाखो टोन प्लास्टिक कचराकुंडीत किंवा इतरत्र टाकण्यात येतात पुढे हेच टाकाऊ प्लास्टिक शेतात नाल्यात किंवा नदीवाटे समुद्रापर्यंत पोहोचतात. क्षुल्लक दिसणारे प्लास्टिक पुढे लोखंड देखील गंजवू शकते यामुळे जमिनीचा कस वाढतो पण प्लास्टिक न कुजल्याने जमिनीचा पोत मात्र बिघडतो.
सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर सरकारने जरी रोख लावला असला तरी यापेक्षाही सिंगल युज प्लास्टिकच्या उत्पादनावर रोख लावणे महत्त्वाचे आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर, टाकाऊ प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून इतर काही गोष्टी तयार करणे, याबाबत प्रशासनानेही अभ्यास करणे आवश्यक आहे.
प्लास्टिक वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाण संदर्भात जनजागृती होणे याचबरोबर टाकाऊ प्लास्टिकच्या इतर पर्यायांचा शोध आणि उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. प्लास्टिक मुक्त बेळगाव मोहीम राबवण्यासाठी शासनाबरोबरच नागरिकांनीही ‘नो प्लास्टिक’ हे धोरण अंगीकारणे गरजेचे आहे.