अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य बक्षीस रकमेच्या आमदार अनिल बेनके करंडक खुल्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज शुक्रवारी सकाळी सरदार्स मैदानावर मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत कर्नाटकसह देशातील 44 क्रिकेट संघांचा सहभाग आहे.
सरदार मैदानावर आज सकाळी स्पर्धेचे आयोजक बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून बेळगावच्या खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी आदी उपस्थित होते.
प्रारंभी विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमाचे दिवंगत प. पू. श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार ॲड. बेनके यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते मैदानातील क्रिकेट यष्ट्यांचे पूजन झाल्यानंतर श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, बेळगावच्या क्रिकेटप्रेमींची सरदार्स मैदानावर मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व्हावी अशी गेल्या तीन-चार वर्षांपासूनची इच्छा होती. यासंदर्भात यापूर्वी मी वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत या मैदानावर मोठी क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार मी आज ही स्पर्धा भरवत आहे. बेळगावचे सरदार्स मैदान मुंबई, बेंगलोर सारख्या परगावच्या ठिकाणी असलेल्या क्रिकेटपटूंचे आवडते मैदान आहे.
सरदार्स मैदान म्हटलं की देशातील कोणताही टेनिस बॉल क्रिकेटपटू हातातील मोठी स्पर्धा सोडून या ठिकाणी खेळण्यास उत्सुक असतो. त्यामुळेच यावेळी मुंबई, गुजरात, राजस्थान, गोवा, हुबळी -धारवाड अशा वेगवेगळ्या ठिकाणचे क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळताना पहावयास मिळणार आहेत. त्यामुळे पुढील 12 -13 दिवस बेळगावकरांसाठी हा एक वेगळा अनुभव असणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे काय? हे खऱ्या अर्थाने पाहण्याची संधी या स्पर्धेद्वारे सर्वांना मिळणार आहे. याचा पुरेपूर लाभ बेळगावच्या क्रीडाप्रेमींनी घ्यावा असे सांगून शिस्त व शांतता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या सर्वांनी पाळाव्यात. कोठेही गोंधळ न घालता अथवा गालबोट न लावता ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.
व्यासपीठावरील अन्य मान्यवरांची स्पर्धेला शुभेच्छा देणारी भाषणे झाल्यानंतर प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यांनी आमदार अनिल बेनके करंडक खुल्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. आज उद्घाटनाच्या दिवशी फौजी इलेव्हन विरुद्ध बीआरडीएस इलेव्हन आणि सीटी पोलीस इलेव्हन विरुद्ध महानगरपालिका इलेव्हन असे सामने खेळविण्यात येणार आहेत.
आज आणि उद्या असे दोन दिवस प्रदर्शनीय सामने खेळविण्यात येणार असून रविवारपासून मुख्य स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धेत एकूण 44 संघाने सहभाग दर्शवला असून त्यामध्ये कर्नाटकातील 28 आणि बाहेरच्या 16 संघांचा समावेश आहे.