बेळगाव : बेळगावला ऐतिहासिक परंपरा आहे, हे सर्वश्रुत आहे. बेळगाव आणि परिसरात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजही आपण पाहतो. ऐतिहासिक वास्तू, इमारती, संस्थानिकांचा इतिहास यासारख्या अनेक इतिहासाच्या अस्तित्वाच्या खुणा आज बेळगावमध्ये शाबुत आहेत.
मात्र बेळगाव केवळ इतक्याच ऐतिहासिक पाऊलखुणा जपण्यासाठी नसून आजवरच्या अनेक ऐतिहासिक घटना या धूसर झाल्यामुळे त्या खुद्द बेळगावकरांनाही माहित नसल्याचे समोर आले आहे. अशा ऐतिहासिक अस्तित्वाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी बेळगावच्या इतिहास अभ्यासकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
बेळगाव शहरालगत असलेल्या किल्ला परिसरात असणारा भुईकोट किल्ला आणि येळ्ळूर येथील राजहंसगड किल्ला या दोन सुस्थितीत असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांव्यतिरिक्त जुने बेळगाव येथेही किल्ला असल्याचा इतिहास उपलब्ध आहे. मात्र या किल्ल्याच्या अस्तित्वाच्या खुणा आज भुईसपाट झाल्या आहेत. मात्र या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध आहे, हि बाब सकारात्मक आहे.
बेळगाव आणि परिसरातील जुने किल्ले, शहराची रचना यामुळे या सर्व किल्ल्यांची बेळगावच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका आहे. बेळगाव मध्ये असलेल्या भुईकोट किल्ल्यात बहामनी ते इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी येऊन गेल्या.
याबाबतच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आजही पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्या त्या काळात ज्या संस्थानिकांनी पुढाकार घेतला, त्यादरम्यान काही शिलालेख, शिलामुर्ती सापडल्या आहेत. या अनुषंगानेही इतिहास संशोधकांनी अभ्यास करणे आवश्यक आहे.भुईकोट किल्ल्याप्रमाणे येळ्ळूर राजहंसगडावरदेखील काही शिलालेख असण्याची शक्यता आहे. येळ्ळूर येथील राजहंसगडावर एक विहीर आहे, त्याचप्रमाणे तटबंदीही आहे. एकंदर या किल्ल्यावर अशा काही गोष्टी निदर्शनात येतात ज्या ऐतिहासिक घटनांना उजाळा देतात.
बेळगावचा इतिहास हा आजही कित्येकांना पूर्णपणे माहीत नाही. यासाठी बेळगावमधील इतिहास अभ्यासकांनी बेळगावच्या इतिहासाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अभ्यास पथक स्थापन करणे आवश्यक आहे. बेळगावमध्ये आज अनेक महाविद्यालये कार्यरत आहेत. या महाविद्यालयामध्ये स्वतंत्र इतिहास विभाग देखील कार्यरत आहे.
या अनुषंगाने महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन बेळगावच्या इतिहासाबाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी ऐतिहासिक पुरावे आहेत त्याठिकाणच्या गावांना भेटी देऊन, त्या त्या गावातील ज्येष्ठ नागरिक, घराणी यांच्यामाध्यमातून गावचा आणि त्या परिसराचा इतिहास जाणून घेणे, दगडी शिलालेखाच्या माध्यमातून माहिती जमा करणे आणि सर्व माहितीची मांडणी करणे हे आवश्यक आहे.
आज बेळगावमध्ये हाकेच्या अंतरावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. मठ आहेत. या वास्तूमध्ये कागपत्रे उपलब्ध आहेत. शिलालेख आहेत. त्यावर इसवीसन नोंद आहेत. या सर्व दृष्टिकोनातून उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक खुणा तपासून इतिहासकारांनी बेळगावचा इतिहास मांडण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून पुढील पिढीला बेळगावचा इतिहासही जाणून घेता येईल आणि तो इतिहास जोपासताही येईल.
बेळगाव शहराच्या रचनेचे वेगळेपण, बेळगावची बाजारपेठ, बाजारपेठेची इंग्रज दफ्तरी असलेली नोंद, भातशेती, बेळगावचा बासमती तांदूळ, बासमती तांदळासंदर्भात इंग्लंडमध्ये असलेली नोंद या सर्व माहितीचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून या सर्व बाबी जतन करून ठेवणे आवश्यक आहे. केवळ इतिहास अभ्यासकच नाही तर इतिहासप्रेमींनी देखील आपापल्या गावाचा इतिहास लिहिण्यासाठी पुढाकार घ्यावा, वर्तमानातील नोंदी ठेवाव्यात. काळाच्या ओघात अनेक गोष्टी निघून जातात. मात्र इतिहासाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी महत्वाच्या असतात. या अनुषंगाने इतिहास प्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी पुढाकार घेऊन हे काम करणे गरजेचे आहे.