मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे (एमएलआयआरसी) ‘ग्रामसेवा देशसेवा’ अंतर्गत कलखांब (ता. जि. बेळगाव) गावामध्ये आयोजित विविध उपक्रम व कार्यक्रम उत्साहात पार पडले.
एमएलआयआरसीतर्फे कलखांब गावामध्ये काल शुक्रवारी वीर माता आणि वीर नारींचा सत्कार, वैद्यकीय शिबिर, स्वच्छ भारत व अग्निपथ योजनेसंदर्भात जनजागृती त्याचप्रमाणे अन्य क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सत्कार समारंभ व अन्य कार्यक्रम -उपक्रमांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जोयदीप मुखर्जी यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ब्रिगेडियर मुखर्जी यांनी देश संरक्षणाच्या मोठ्या जबाबदारीचा एक भाग म्हणून समाज कल्याणसाठी वचनबद्ध असलेले भारतीय लष्कर कलखांब गावाच्या विकास आणि प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच गावकऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कलखांब आणि परिसरातील वीर माता व वीर नारींचा गौरव करण्यात आला.
पंतप्रधानांच्या पुढाकाराने दिल्ली बाहेरील प्रादेशिक विभागातील (रिजनल कमांड) नामनिर्देशित ठिकाणी आर्मी डे परेड -2023 चे आयोजन केले जाणार आहे. आर्मी डे परेडच्या निमित्ताने नागरिकांच्या देशभक्तीचे प्रदर्शन घडविण्यासाठी आणि देशाच्या उभारणीत भारतीय लष्कराची भूमिका व वचनबद्धता दर्शवण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचणे, अमृत सरोवरांवर काम करणे, वृक्षारोपण वगैरे कार्यक्रम -उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
यासाठी आजादी का अमृत महोत्सवावर आधारित ‘ग्रामसेवा देशसेवा’ ही थीम बनविण्यात आली असून त्याद्वारे भारतीय लष्कर आणि जनतेमधील बंध अधिक बळकट केले जाणार आहेत.
उच्च दर्जाची सर्वसमावेशकता आणि पारदर्शकता प्राप्त करण्यासाठी समाजाच्या सर्व थरातील नागरिक, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, वीर माता, वीर नारी आणि ज्येष्ठ नागरिक ग्रामसेवा देशसेवा उपक्रमांमध्ये भाग घेत आहेत.