छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी तसेच राज्यातील गड आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन करण्याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या गड संवर्धन समितीमध्ये कडोली (ता. जि. बेळगाव) गावचे सुपुत्र पंडीत अतिवाडकर याची पुणे विभागातून सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री या गड संवर्धन समितीचे अध्यक्ष असणार असून संस्कृतिक कार्य विभाग सचिव उपाध्यक्ष असणार आहेत. या उभयतांसह राज्यस्तरीय गड संवर्धन समितीमध्ये 14 सदस्य असून विभागीय समित्यांमध्ये कोकण विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद व नांदेड विभाग या विभागांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने यापैकी पाच सदस्यांच्या पुणे विभागामध्ये कडोलीच्या (ता. जि. बेळगाव) दुर्गप्रेमी पंडीत अतिवाडकर यांची निवड केली आहे. उमेश झिरपे, संतोष हसुरकर, श्रमिक गोजमगुंडे व भगवान चिले हे या विभागाचे अन्य सदस्य आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीतील निवडीबद्दल पंडित अतिवाडकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संबंधित विभागातील गडकोटांविषयी सर्वांकष माहिती गोळा करणे व जिल्हा निहाय किल्ले गॅझेटिअर्स तयार करण्यासाठी त्या त्या विभागीय कार्यालयास मदत करणे. त्या त्या विभागातील किल्ल्यांच्या किल्लेनिहाय जतन दुरुस्ती व संवर्धन कार्याबाबत शासनाला शिफारस करणे. गडकिल्ल्यांच्या संवर्धना बरोबरच पर्यटकांना किल्ल्यांचे पावित्र्य राखून व पुरातत्वीय नियमानुसार कोणत्या सुविधा देता येतील याबाबत शिफारस करणे. या पर्यटन विकास कार्यक्रमास स्थानिक बचत गट, किल्ल्यावर काम करणाऱ्या संबंधित स्वयंसेवी संस्था आणि परिसरात राहणारे स्थानिक लोक यांचा रोजगार वाढीस कसा सहभाग असेल याविषयी विभागास शिफारसी करणे. महाराष्ट्र शासनाच्या वैभव स्मारक संगोपन योजनेअंतर्गत किल्ले दत्तक घेण्यासाठी खाजगी उद्योजक, काॅर्पोरेटस् यांना उद्युक्त करणे तसेच वैभव संगोपनाचे प्रस्ताव सीएसआर व स्वयंसेवी संस्थांतर्फे कसे मार्गी लागतील याबाबत संस्थांना मार्गदर्शन करणे, तसेच या संस्था व संचालनालयाचे विभागीय कार्यालय यांचा समन्वय साधणे. आपापल्या कार्यक्षेत्रातील गडकिल्ल्यांच्या विकासासाठी मार्गदर्शक सूचना करणे, हे काम महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन विभागीय समितीचे सदस्य असलेल्या पंडित अतिवाडकर यांना करावे लागणार आहे.