Monday, May 6, 2024

/

मतदार यादीतील नावासाठी नागरिकांनी व्हावे जागरूक -मुळगुंद

 belgaum

मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. मात्र हे कर्तव्य पार पाडण्याकडेच शहरवासीयांचे दुर्लक्ष होत आहे. अशातच मनपाच्या निवडणुकीमुळे एकाच कुटुंबातील मतदारांची सोयीस्करपणे विभागणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका निवडणूक प्रभाग रचना झाल्यानंतर मतदारांची विभागणी करण्यात आली, तथापि त्यामध्ये काही मतदारांची नावे वगळण्यात आली होती तर असंख्य मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात असल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. प्रशासनाने केलेल्या घोळाचा फटका शहरवासीयांना बसला आहे. तेंव्हा सध्या मतदार यादी पडताळणी सुरू असल्यामुळे प्रत्येक सज्ञान मतदाराने या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे येत्या 8 डिसेंबरपूर्वी तपासून खात्री करून घ्यावी, असे आवाहन भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.

आधीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत आणखीनच भर पडत आहे. सध्या 2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आधार लिंक करणे, नवीन मतदारांची नावे दाखल करणे, मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी करणे, मतदार यादीतील चुकीच्या नावांची दुरुस्ती करणे अशी विविध कामे सध्या सुरू आहेत. महापालिकेच्या व्याप्तीमध्ये शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदार संघ येत असल्याने मुख्य कार्यालयात स्थलांतर करण्यात आलेल्या निवडणूक विभागात हे काम सुरू आहे. पूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यालय असल्याने कोणत्याही समस्यांचे निवारण करण्यासाठी सोयीचे ठरत होते. मात्र निवडणूक कार्यालय मुख्य कार्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. अशातच हे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयाची माहिती मिळत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या मजल्यावर पायऱ्या चढून जाणे वृद्ध मतदारांना शक्य होत नाही. त्यामुळे मतदान करण्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक आता मतदार यादीत आपले नांव आहे की नाही? किंवा नसल्यास नांव दाखल करण्यासाठी कार्यालयाकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे मतदानाच्या हक्कापासून त्यांना वंचित राहावे लागणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या वेळी हजारो मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. याला अनेक करणे असली तरी बऱ्याचशा मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली होती, तर एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात जोडली गेली होती. त्यामुळे मतदानापासून त्यांना वंचित राहावे लागले. सजग नागरिकांनी आता मतदार यादीत आपले नांव आहे का? हे तपासण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तत्पूर्वी दि. 8 डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नांव आपले आहे की नाही? हे पाहून त्याबाबत तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. जर मतदार यादीत नांव नसल्यास नांव दाखल करणेसाठी अर्ज करणे, चुकीचा उल्लेख असल्यास दुरुस्ती करणे. तसेच अन्य प्रभागाच्या मतदार यादीत नांव असल्यास ते दुरुस्त करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रथम मतदार यादीत नांव असणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येक नागरिकांनी मतदार यादीत नांव तपासण्याची गरज आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक होत असल्याने मतदारांचे नाव मतदार यादीत असल्यासच हक्क बजावता येणार आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात येत आहे.Sujit mulgund

 belgaum

महापालिका निवडणुकी वेळी तसेच प्रत्येक निवडणुकीत व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम या निवडणूक मतदान यंत्रांवर मतदान घेण्यात येत आहे. मात्र मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळे निवडणुकीवरील नागरिकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका व्हीव्हीपॅट व ईव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध सरकारी कार्यालयामध्ये कांही अधिकारी वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. त्यामुळे भ्रष्ट कारभाराला ऊत आला आहे. भ्रष्टाचार रोखण्यास शासन व्यवस्थितपणे चालवण्यासाठी सरकारने बदली प्रक्रियेची नियमावली निश्चित केली आहे. परंतु या नियमावलीचे उल्लंघन शासनच करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक अधिकारी 3 वर्षाहून अधिक काळ एकाच कार्यालयात असताना देखील त्यांची बदली केली जात नाही. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात एकाच कार्यालयात 3 वर्षाहून अधिक सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच निवडणूक आयोगाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मतदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याची गरज आहे. मतदारांना प्रत्येक गोष्ट सोयीची करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतदान यादीत नांव दाखल करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्याकरिता शासनाने ‘व्होटर्स हेल्पलाइन’ उपलब्ध केली आहे. या माध्यमातून मतदार यादी तपासणी तसेच नांव दाखल अथवा कमी करण्याची सुविधा या ऑनलाइन ॲपद्वारे घरबसल्या उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ‘नॅशनल व्होटर्स सर्व्हीस’ पोर्टलच्या माध्यमातून मतदार यादीची पडताळणी करता येऊ शकते. शासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांचा उपयोग करून मतदारांनी मतदान यादीची तपासणी करावी व यादीत आपले नांव आहे की नाही? याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन सुजित मुळगुंद यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.