कर्नाटक -महाराष्ट्र यांच्यातील पेटलेला सीमावाद आणि काल मंगळवारी इतर वाहनांसह बसेसना फासण्यात आलेले काळे आणि दगडफेकीच्या घटना या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ (केएस आरटीसी) आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएआरटीसी) यांनी आज बुधवारी आपली महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराज्य बस वाहतूक रद्द करून बंद ठेवली आहे.
महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द झाला तरी काल मंगळवारी कन्नड संघटनांनी बेळगावसह शहर परिसरात धुडगूस घालून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हिरबागेवाडी टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले 10 वाहनांची तोडफोड करण्यात आली.
तेथे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते. मात्र तरीही कन्नडिगांनी महाराष्ट्र राज्यातील ट्रक व इतर वाहनांवर चढून धिंगाणा घातला लाल -पिवळे झेंडे फडकवून महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकली.
काही वाहनांच्या नंबर प्लेट्स फोडित कांही वाहनांना काळे फासले. प्रत्युत्तर दाखल महाराष्ट्रामध्ये देखील त्याची पडसाद उमटली आणि त्या ठिकाणी कर्नाटकच्या बसेस, ट्रक आणि इतर वाहनांवर हल्ला करून काळे फासण्यात आले.
तसेच काहींची तोडफोड करण्यात आली. या घटनांची गांभीर्याने दखल घेत कर्नाटक आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळांनी दोन्ही राज्यांमधील आंतरराज्य बस वाहतूक आज बंद ठेवली आहे. तथापि पोलिसांनी जबाबदारी घेऊन परवानगी दिल्यास कर्नाटक वायव्य राज्य परिवहन मंडळाची (एनडब्ल्यूकेआरटीसी) बस सेवा आज रात्री सुरू होण्याची शक्यता आहे.