महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासाठी व्हॅक्सीन डेपो मैदानाच्या परवानगी अर्जावर लेखी उत्तर देण्यास नकार देणार्या महापालिका आयुक्तांच्या आडमुठेपणाविरोधात म. ए. समितीच्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी आंदोलन केले. आयुक्तांच्या भुमिकेचा निषेध केला.
अधिवेशनाविरोधात व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा होणार आहे. त्यासाठी मैदानाच्या परवानगीचा अर्ज देण्यात आला आहे. पण, त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
माजी महापौर शिवाजी सुंठकर, किरण सायनाक, अॅड. अमर येळ्ळूरकर, अॅड. रतन मासेकर यांना आयुक्त घाळी टाळाटाळ करत होते. आज आयुक्तांना भेटण्यासाठी महापालिका कार्यालयात गेले होते. त्याठिकाणी समितीच्या माजी महापौर, नगरसेवकांचा अपमान करण्यात आला.
तुम्हाला मैदानाची परवानगी मिळणार नाही, तुम्ही जाऊ शकता, असे त्यांच्याकडे न बघताच सांगत होते. त्यावर माजी महापौरांनी आम्ही परवानगी देणार नाही हे लेखी स्वरूपात द्या, अशी मागणी केली. तरी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नेत्यांनी दरवाजातच आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.
त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. आयुक्तांनी त्यांना आत बोलावून खुर्चीत बसायला सांगितले. त्यानंतरही परवानगीबाबत लेखी काहीही देण्यास नकार दिला. त्यामुळे संताप व्यक्त करत समिती नेत्यांने आंदोलनाची सांगता केली.