टिळकवाडीतील हेरवाडकर हायस्कूलसमोर रस्त्याशेजारी खरकट्या प्लास्टिकच्या ताटांचा खच टाकून अस्वच्छता पसरविण्यात आल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर गैरप्रकार बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनीच केला असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गेल्या सोमवारी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा दडपशाही करून होऊ देण्यात आला नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर करण्यात आला.
आता महामेळावा झाला नसला तरी व्हॅक्सिन डेपो मैदान आणि दुसरे रेल्वे गेट परिसरातील पोलीस बंदोबस्त अद्याप हटविण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या रेल्वे गेटनजीक हेरवाडकर हायस्कूलसमोर रस्त्याकडेला भोजन आणि नाश्त्यासाठी असलेल्या खरकट्या प्लास्टिकच्या ताटांचा खच टाकून अस्वच्छता पसरविण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आला.
या ठिकाणी हेरवाडकर हायस्कूल शाळा आणि शाळेसमोर असलेली दुकाने आणि वर्कशॉप वगळता एका अपार्टमेंट आहे. वर्षानुवर्षे त्या ठिकाणी असलेले दुकानदार आणि अपार्टमेंटमधील लोक या पद्धतीने प्लास्टिकची खरकटी ताटे रस्त्या कडेला फेकणे शक्यच नाही.
त्यामुळे हा गैरप्रकार सध्या त्या परिसरात बंदोबस्त असलेल्या पोलिसांकडून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकाराबद्दल आसपासचे नागरिक आणि रस्त्यावरून ये -जा करणाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.