महाराष्ट्राचे सीमा भाग समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सीमा भागाचा दौरा नेमका कोणत्या स्वरूपात होणार असा प्रश्न आणि संभ्रम सध्या संपूर्ण सीमा भागात पाहायला मिळतोय. 2 डिसेंबर रोजी येणारे दादा अखेर 6 डिसेंबरला येणार की येणारच नाहीत….? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या सीमा भागात ऐकायला मिळत आहेत. यासंदर्भात सीमा वासियांचे नेते कार्यकर्ते आणि समस्त सीमा वासिय जनता सारेच संभ्रमात आहेत.
कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सीमा समन्वयक मंत्र्यांचा दौराच रद्द करा. अशी मागणी केल्यानंतर या संभ्रमात मोठी वाढ झाली आहे. यापूर्वीच्या अनेक दौऱ्यांप्रमाणेच हा दौराही राजकीय नाट्य ठरणार का? असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे. कर्नाटकातील सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिकांच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सीमा समन्वयक मंत्र्यांचा दौरा ही एक मोठी आशेचा किरण देणारी बाब ठरली असती. मात्र ठरलेल्या दिवशी चंद्रकांत दादा आले नाहीत. यामुळे ही बाब निराशेची ठरली. आता चंद्रकांत दादांचा नवा टूर प्रोग्रॅम अध्याप दाखल झालेला नसल्यामुळे संभ्रमात नक्कीच वाढ होऊ लागलेली आहे.
कर्नाटकाच्या भाजप सरकारने महाराष्ट्राच्या भाजप सरकारवर सरशी केली का? अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य सीमावासियांना पडू लागला आहे. बेळगाव मधील सीमा वसियांच्या दृष्टीने अशा प्रकारची नाटके अनेकदा महाराष्ट्रातील सरकारने तेथील मंत्र्यांनी आणि सीमा समन्वयासाठी नेमलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेली आहेत.
यापूर्वी चंद्रकांत दादा सीमा समन्वयक मंत्री असताना एकदाही बेळगावला फिरकले नाहीत आणि कन्नड माणसांच्या कार्यक्रमाला गेले. हा आरोप त्यांच्यावर अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी चंद्रकांत दादांचा दौरा दाबला का? अशा प्रकारची शंका कुशंका सीमा वासियांच्या मनामध्ये निर्माण होणे सध्यातरी स्वाभाविक बनले आहे.
एकंदर परिस्थितीत दौऱ्याचे नाटक होणार की दादा सीमा भागात दाखल होऊन प्रयोग यशस्वी करणार हाच आता चर्चेचा आणि कळीचा मुद्दा ठरला आहे. दादांचा शो जर फ्लॉप झाला तर ती कर्नाटक भाजप समोर महाराष्ट्र भाजप समोर सपशेल हार ठरणार आहे.