Saturday, December 21, 2024

/

बेळगावमधील सुनसान ‘सायकल ट्रॅक’ची व्यथा…!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : गेल्या २ ते ४ वर्षात बेळगाव स्मार्ट सिटी योजने अंतर्गत अनेक विकासकामांची (?) रेलचेल सुरु आहे. रस्तेविकास, स्मार्ट बस स्थानक, स्मार्ट पथदीप यासह अनेक ‘स्मार्ट’! योजना बेळगावमध्ये राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक असलेली ‘सायकल ट्रॅक’ची योजना! इंधन बचन, सुरक्षितता, पर्यावरण प्रदूषणापासून बचाव या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार करून शहरात अनेक ठिकाणी ‘सायकल ट्रॅक’ची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु यापैकी कोणत्याही ‘सायकल ट्रॅक’चा वापर सायकलस्वार करताना दिसत नाहीत. लाखो-करोडो रुपये खर्चून जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेले सायकल ट्रॅक याचा वापर सायकलस्वार कधी करणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

बेळगावचा विकास झपाट्याने होत चालला आहे. विविध संस्था, मोठमोठे उद्योग, कारखाने यासह विविध गोष्टींच्या माध्यमातून बेळगावमध्ये वाढलेली रहदारी आणि ठिकठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांमुळे, रहदारी, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने वारंवार होत असलेले अपघात. याचा विचार करता बेळगावच्या वाहतुकीला आणि वाहतूकदारांना शिस्त लागणे अनिवार्य आहे. बेळगावमधील वाढती रहदारी आणि वाहनांची वर्दळ जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ताळतंत्र बिघडल्याप्रमाणे वाटत आहे.

बेळगावमध्ये विविध ठिकाणी निर्माण करण्यात आलेले ‘सायकल ट्रॅक’ वापराविना आहेत. आजही अनेक नागरिक सायकलचा वापर करताना आपण पाहतो. मात्र प्रशासनाने निर्माण करून दिलेल्या सायकल ट्रॅक चा वापर क्वचितच सायकलस्वार करताना आढळून येतात. शहर आणि परिसरातील रस्त्यांवर वाढलेली वाहनांची वर्दळ पाहता आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सायकल ट्रॅक चा वापर स्वयंस्फूर्तीने सायकलस्वारांनी करणे गरजचे आहे. मात्र सायकल ट्रॅक चा वापर करण्यात सायकलस्वार मात्र उदासीन दिसून येत आहेत. अनेक सायकल ट्रॅक वर फेरीवाले आणि भिक्षुक ठाण मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत.

सायंकाळच्या वेळेत रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचवेळी शाळकरी मुलांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. असंख्य शाळकरी मुले सायकलचा वापर करतात. मात्र यापैकी कोणतेही विद्यार्थी सायकल ट्रॅक चा वापर करताना दिसून येत नाहीत. अलीकडे बेळगावमध्ये अनेक भीषण अपघात आपण पाहिले आहेत. यातून बोध घेऊन रहदारी आणि वाहतुकीची शिस्त स्वतःहून नागरिकांनी आत्मसात करणी अत्यावश्यक आहे.Cycle track

शहर आणि परिसरात निर्माण करण्यात आलेल्या सायकल ट्रॅक मध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. ‘अवैज्ञानिक; पद्धतीने ‘सायकल ट्रॅक’ निर्माण करण्यात आल्याची प्रतिक्रिया अनेक भागातील नागरिकांनी दिली आहे. प्रशासकीय आणि रहदारी यंत्रणेतील समन्वयाने आणि नियोजनाने हा प्रश्न देखील मार्गी लागेल मात्र तत्पूर्वी सायकलस्वारांमध्ये ‘सायकल ट्रॅक’ बाबत जनजागृती होणे महत्वाचे आहे. ‘सायकल ट्रॅक’चे फायदे, यामुळे रस्त्यावरील वाहतुकीमधून मिळणारी सुरक्षितता याबाबत शालेय स्तरावर, रहदारी विभागाच्यावतीने तसेच स्वयंसेवी संस्थांच्या वतीने याचबरोबर सोशल साईट्स आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. शहरातील अनेक भागात होणारी अवजड वाहनांची वर्दळ पाहता शाळकरी मुलांना ‘सायकल ट्रॅक’ बाबत योग्य माहिती पुरवून विद्यार्ह्यांमध्ये जागृती होणे अत्यावश्यक आहे. शाळा सुटल्यानंतर अनेक विद्यार्थी सुसाट वेगाने रहदारीतून मार्ग काढून सायकल चालविताना दिसतात. अशा विद्यार्थ्यांसाठी हि बाब अत्यंत धोकादायक आहे. इतकेच नाही तर अनेक वयस्कर मंडळीही आज मोठ्या प्रमाणात सायकलचा वापर करताना दिसून येतात. मात्र या कोणत्याही सायकलस्वारांमध्ये ‘सायकल ट्रॅक’ बाबत जनजागृतीच झाली नसल्याने बेळगावमधील ‘सायकल ट्रॅक’ वापराविना असेच स्तब्ध, धूळ खात उभे आहेत.

बेळगावमध्ये निर्माण करण्यात आलेल्या ‘सायकल ट्रॅक’बाबत योग्य जनजागृती, सायकलस्वारांना प्राधान्य आणि प्रशासकीय तसेच रहदारी विभागातील समन्वय आणि नियोजन झाल्यास, यामुळे ‘सायकल ट्रॅक’ची संकल्पना यशस्वी होईल, आणि असंख्य सायकलस्वारांचा प्रवास देखील सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आहे. बेळगावची प्रशासकीय यंत्रणा वेगाने आणि प्रगतीच्या दिशेने कार्यरत असलेली पाहायला मिळत असून ‘सायकल ट्रॅक’ बाबत देखील सकारात्मक पद्धतीने जनजागृती करून योग्य भूमिका निभावेल, यात शंका वाटत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.