Sunday, April 28, 2024

/

गोव्यासाठी दिवसाची रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी

 belgaum

मीटर गेज रेल्वे मार्ग असताना दररोज दिवसा धावणारी बेळगाव ते गोवा रेल्वे आता विस्मृतीत गेली आहे. खरे तर व्यापार, उद्योग आदी सर्व बाबतीत निकटचे संबंध पाहता बेळगाव ते गोवा अशी दिवसाची रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्याची गरज असून तशी जोरदार मागणी केली जात आहे.

या संदर्भात बेळगाव लाईव्हने सिटीझन कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, अलीकडच्या काळात रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असते तरी बेळगाव ते गोवा दरम्यान पूर्वी मीटर गेज रेल्वे मार्ग होता.

त्यावेळी मांडवी एक्सप्रेस ही रेल्वे दिवसाच्या वेळी बेळगाव आणि गोव्या दरम्यान धावत होती. ही रेल्वे सकाळी 9:35 वाजता आणि सायंकाळी 7:30 वाजता बेळगावला यायची. थोडक्यात दिवसभर ही रेल्वे बेळगाव ते गोव्यादरम्यान धावायची, जी सर्वांसाठी अतिशय अनुकूल होती. या रेल्वेमुळे भाजीपाला, फुले, किराणी सामान आदी व्यापारी वर्गासह सर्वांसाठीच ही रेल्वे सोयीची होती.

 belgaum

बेळगाव हे व्यावसायिक केंद्र असून येथून गोव्याला ताजा भाजीपाला, किराणामाल, औद्योगिक उत्पादने वगैरेंचा जास्तीत जास्त पुरवठा होत असतो. त्यामुळे बेळगाव आणि गोव्यामध्ये व्यापारी देवाणघेवाण गेल्या कित्येक वर्षापासून सुरळीत सुरू आहे. तथापि मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गामध्ये रूपांतर झाल्यापासून या देवाणघेवाणीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

कारण मीटर गेज रेल्वे मार्ग बंद झाल्यानंतर रोडगेज मार्ग सुरू होण्यासाठी जवळपास 5 वर्षांचा कालावधी गेला आणि त्यानंतर दिवसाची बेळगाव -गोवा रेल्वे सेवा सुरू झाली नाही. ब्रॉडगेज झाल्यानंतर अलीकडे कोरोना प्रादुर्भावाच्या आधी चांचणी दाखल दिवसाची मोजक्या दोन डब्यांची रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. मात्र अल्पावधीत ती बंद झाली. एकंदरीत या सर्व प्रकारामुळे हुबळी येथून गोव्याला बऱ्याच रेल्वे गाड्या असल्यामुळे बेळगावची गोव्याशी असणारी व्यापारी देवाण-घेवाण हुबळीकडे वळली.

Railways station
Railways station belgaum

या संदर्भात सिटीजन कौन्सिल बेळगावने 6 महिन्यापूर्वी रेल्वे मंत्रालयाकडे बेळगाव ते गोवा दिवसाची रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी केली आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास बेळगाव आणि गोवा राज्यामध्ये असलेली व्यापारी देवाण-घेवाणीची विस्कटलेली घडी पूर्वत होईल असेही रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बेळगाव -गोवा दरम्यानची दिवसाची रेल्वे सेवा सुरू झाल्यास बेळगावच्या व्यापार उद्योगासह गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला देखील त्याचा फायदा होईल. सध्याची वस्तुस्थिती लक्षात घेता गोवा -बेळगाव दरम्यान दिवसभरात फारशा रेल्वे धावत नाहीत. त्यामुळे तसा फारसा व्यस्त नसणारा हा मार्ग दिवसाच्या बेळगाव -गोवा रेल्वे सेवेसाठी उपयुक्त ठरू शकतो. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार नैऋत्य रेल्वेच्या वरिष्ठांनी करावा, असे मत सतीश तेंडुलकर यांनी व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.